'एप्रिल मे ९९' चित्रपटाबद्दल अमृताने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझं हरवलेलं काहीतरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:36 IST2025-05-23T11:32:57+5:302025-05-23T11:36:07+5:30
"कधी नकळत डोळ्यांत पाणी आणलं अन्...", 'एप्रिल मे ९९' चित्रपटाबद्दल अमृता खानविलकरची खास पोस्ट, म्हणाली...

'एप्रिल मे ९९' चित्रपटाबद्दल अमृताने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझं हरवलेलं काहीतरी..."
April May 99 Movie :मराठी चित्रपटांच्या निर्मितीची वाढती संख्या आहे, ही सुखावणारी बाब आहे. यंदा २०२५ या वर्षात नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता मराठी सिनेविश्वात एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट म्हणजे 'एप्रिल मे ९९'. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ (April May 99 Movie) हा चित्रपट आज २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशातच या चित्रपटाबाबत अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. दरम्यान, एप्रिल मे ९९ चित्रपचाबद्दल अमृता खानिविलकरने दिग्दर्शकांचं कौतुक करत सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने रोहन मापुस्कर यांना टॅग करत म्हटलंय की, "हा चित्रपट पाहून असं वाटलं… जसं मी मनाच्या खोल खोल कपाटात लपवून ठेवलेला एक भावविश्वाचा अल्बम उघडला, एक असा अल्बम, ज्यात अनेक आठवणी धूसर झाल्या होत्या, तर काही भावना गहिऱ्या होत्या… आणि तोच अल्बम मी तुझ्या चित्रपटात पाहिला. हा चित्रपट केवळ पाहणं नव्हतं… तो अनुभवणं होतं. कधी हसवलंस, कधी नकळत डोळ्यांत पाणी आणलंस… पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तू मला माझ्याच भावना पुन्हा एकदा जाणवायला लावल्या. जणू या चित्रपटाने माझ्या मनातल्या विसरलेल्या कोपऱ्यांना उजेड दिला. चित्रपट संपल्यावर एकच भावना मनात घोळत होती हा अल्बम म्हणजेच तुझा चित्रपट, तो मी घरी घेऊन जावं, हळुवार मिठीत घ्यावं, हृदयाशी घट्ट धरून बसावं आणि फक्त शांतपणे त्याला अनुभवत राहावं. तुझ्या या कलाकृतीत एक नितळ सच्चेपणा आहे. यात लपलेली जादू अशी आहे की, ती प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातलं काहीतरी उलगडते." अमृताच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
त्यानंतर पुढे अभिनेत्री लिहलंय, "हा चित्रपट म्हणजे एखाद्या ऋतूची गंधमय सुरुवात आहे. जसं पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध हवेत दरवळतो आणि नकळत मनात खोलवर शिरतो… अगदी तसंच काहीसं झालं. एक अलवार, शुद्ध, ओलसर असा अनुभव जो काळजाच्या एका कोपऱ्यात अलगद विसावला. तुझ्या या सुंदर चित्रपटासाठी, आणि मला माझं हरवलेलं काहीतरी पुन्हा भेटवल्यासाठी मनापासून धन्यवाद. Dearest Rajesh sir, @mapuskar तुमच्या रूपानं या चित्रपटाला माया आणि प्रेम मिळालं... प्रेक्षकही हाच गोडवा, हिच आपुलकी अनुभवतील आणि तुमच्याचसारखं प्रेम करतील. या सुंदर प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!" अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे.
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.