"मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं, अन्.."; अमृता धोंगडेने सांगितला आषाढी वारीचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:18 IST2025-07-07T17:16:49+5:302025-07-07T17:18:14+5:30
अमृता धोंगडेने यंदा आषाढी वारीचा अनुभव घेतला. अमृताने तिला आलेला अनुभव शब्दबद्ध केलाय

"मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं, अन्.."; अमृता धोंगडेने सांगितला आषाढी वारीचा अनुभव
नुकतीच आषाढी एकादशी पार पडली. यावेळी अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता अजिंक्य राऊत वारीत सहभागी झाले होते. त्यावेळी वारीत आलेला अनुभव अमृताने शेअर केला. अमृता म्हणाली, "मी वारीत एक शूट करायला गेले होते. सिंपल स्क्रिप्ट होती. मी आणि अजिंक्य राऊत – नवविवाहित जोडपं. झी टॉकीज च्या कार्यक्रमाची संकल्पना अशी होती की आम्ही पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेतो आणि त्याचं निवेदन करत जातो."
"सुरुवातीला सगळं अगदी एका नॉर्मल शूटसारखंच वाटलं..कॅमेरा ऑन, लाइन डिलिव्हरी, रिअॅक्शन्स – सगळं स्क्रिप्टनुसार सुरू होतं. पण काही वेळातच… सगळं बदललं. मी जसजशी वारकऱ्यांना भेटायला लागले कोणी नंगेपाय, कोणी डोळ्यांत पाणी, तर कोणी अगदी शांतपणे चालणारं…कोणालाही कसलीच तक्रार नाही, कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही .. फक्त एकसंध चालणं, आणि एक गाढ विश्वास – पांडुरंग आपल्यासोबतचं इथं आहे. त्या गर्दीत धुळ उडत होती… आणि त्या धुळीबरोबर माझे सगळे प्रश्न कुठेतरी मागे पडत गेले. त्या अदभुत वातावरणात मी स्वतःला हरवून बसले."
"त्या क्षणी मी फक्त अभिनेत्री किंवा निवेदिका नव्हते मी त्या वारीचा एक भाग झाले होते. मी वारकरी झाले होते. माझ्यासाठी तो क्षण फार मोठा होता,
जेव्हा एका आजोबांनी “माऊली ठेवा” म्हणत मला प्रसाद दिला. तो प्रसंग तसा हलकासा होता … पण तो माझ्या आत खोलवर हलवून गेला. मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. पालखी समोरून गेली तेव्हा… काही शब्दच बोलता आले नाही कारण कित्येक वर्षांनीं माझं मन अतिशय प्रसन्न झालेलं."
"त्या क्षणी मनात एक विचार चमकून गेला “पांडुरंग , माउली आपल्याला बोलावत आहे या केवळ या एका आशेवर हे लोक मैलोनमैल चालत राहतात… मग आपण आज आयुष्यात नक्की काय शोधत चाललोय?” त्या वेळी माझ्या डोक्यातून स्क्रिप्ट निघून गेली होती. मी त्या चालणाऱ्या माणसांमध्ये एक सामान्य व्यक्ती बनून गेले होते जिच्या मनात फक्त एकच भावना होती: “खरंच आपण आज इथे असायलाच हवं होतं. आणि आज झी टॉकीज च्या शो मूळे आज आहोत , आणि मन शांत झालं."
"अर्थात मी निवेदिका म्हणून गेले… पण वारीने मला खूप काही शिकवलं. आणि या पांडुरंगाच्या गर्दीतून मी स्वतःला नव्यानं ओळखलं. मात्र हा अनुभव आता फक्त माझाच राहिला नाही तो आता झी टॉकीजच्या प्रत्येक प्रेक्षकाचा आहे. कारण वारीचा हा प्रवास रोज त्यांनीही घरात बसून अनुभवला … आणि प्रत्येकाच्या मनातही पोहोचला. वारी आता संपली आहे…पण मी हरवले नाही काहीतरी नव्यानं सापडलंय, मात्र जे अजूनही शब्दांत मांडता येत नाही.”