"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:31 IST2025-07-05T12:30:02+5:302025-07-05T12:31:06+5:30
मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा, असं म्हणणाऱ्या व्यावसायिक सुशील केडियाचा यांचा भरत जाधव यांनी निषेध करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर मराठीप्रेमींच्या दबावासमोर झुकत या संदर्भातील शासन आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. या निमित्ताने मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या हितासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. आज वरळीमध्ये विजय मेळावा होत आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारही उपस्थित आहेत.
मराठी अभिनेता भरत जाधव यांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करतोय. पण, मला असं वाटतं की मराठी माणसाने आता जागं व्हायला हवं. मराठीपणा जपायला हवा. मी असं म्हणत नाहीये की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. हिंदी पण चांगलंच आहे. पण सक्तीची नसावी याच गोष्टीवर आपण आहोत".
यासोबतच मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा, असं म्हणणाऱ्या व्यावसायिक सुशील केडियाचा यांचाही भरत जाधव यांनी निषेध करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "इथे येऊन तुम्ही धंदा करता, व्यवसाय करता...मग मराठी बोलायची लाज का वाटते? मग अभिमानाने सांगता कशाला की ३० वर्ष मी इथे राहतोय...इथेच तुम्ही बिजनेस करता, मराठी माणसांवर राज्य करता आणि त्यांनाच लांब करता. ही चुकीची गोष्ट आहे. मी याचा निषेध व्यक्त करतो", असं भरत जाधव म्हणाले.