'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:04 IST2025-09-16T17:01:45+5:302025-09-16T17:04:34+5:30
Kedar Shinde on Jatra 2: केदार शिंदेंनी 'जत्रा २' च्या चर्चांवर दिलं उत्तर, म्हणाले...

'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
Kedar Shinde on Jatra 2: २००५ साली आलेला 'जत्रा' (Jatra) हा मराठीतला कल्ट सिनेमा आहे. केदार शिंदेंचा (Kedar Shinde) हा सिनेमा कल्ट क्लासिक ठरला. आजही हा सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येकवेळी लोकांना हसवतो. भरत जाधव, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, कुशल बद्रिके असे अनेक कलाकार या सिनेमात होते. 'ह्यालागाड त्यालागाड' ही गावांची नावंही लोकांनी भलतीच आवडली होती. नुकतंच 'जत्रा'च्या टीमने लोकमत फिल्मीसोबत बोलताना सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. केदार शिंदेंनी यावेळी 'जत्रा २'बद्दलही भाष्य केलं.
'जत्रा'ने लोकांना इतकं हसवलं पण मला खूप रडवलं
'लोकमत फिल्मी'च्या 'लाईट्स, कॅमेरा, रियुनियन' या कार्यक्रमात केदार शिंदे म्हणाले, "जत्रा इतका हसवणारा सिनेमा मला खूप रडवून गेला. अंदाज अपना अपना ही चालला नव्हता. मात्र तो हिंदीतला कल्ट सिनेमा झाला. तसंच जत्रा आला तेव्हाही तो इतका चालला नव्हता. मात्र नंतर तो सॅटेलाईटवर आला, कोंबडी पळाली गाणं गाजलं. आजही २० वर्षांनंतर लोक जत्रावर इतकं भरभरुन बोलतात. तसंच हा माझा पहिलाच निर्मिती केलेला सिनेमा. तेव्हा निर्मितीचा अनुभव नव्हता. त्यावेळी जे कर्ज घेतलं ते पुढली १० वर्ष मी फेडत होतो. त्यामुळे जत्रा ने लोकांना खूप हसवलं असेल पण मला रडवलं."
ते पुढे म्हणाले, "जत्रा हे माझ्या एकट्याचं यश नाही. यातले सहाही जण भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे, गणेश रेवडेकर, रमेश वाणी आणि कुशल बद्रिके हे अक्षरश: वेडे होते. . गावातलेही वेडे माणसं आहेतच. जत्रा ही कायम माझ्या आठवणीत राहणारा सिनेमा आहे."
'जत्रा २' येणार का?
केदार शिंदे म्हणाले, "अनेक लोक मला विचारतात की 'जत्रा २' का काढत नाही. मला तर मनापासून करावासा वाटतो पण या सिनेमाने असा बेंचमार्क सेट करुन ठेवला आहे त्याच्या जवळपास जर गेलो नाही तर चांगला ब्रँड खराब होईल. आजही गावागावात गेल्यावर तिथली मुलं, तरुण, वयस्कर मंडळी भेटतात आणि 'तुमचा जत्रा बघितला आम्ही' असं इतक्या आत्मियतेने बोलतात. तो माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असतो."