संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अॅण्ड वॉरवाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:31 IST2025-06-27T12:30:33+5:302025-06-27T12:31:10+5:30
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ला स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलिकडेच तिने संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले.

संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अॅण्ड वॉरवाला..."
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ला स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमीच सर्वांसमोर आपले मत बेधडकपणे व्यक्त करते. अलिकडेच तिने संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. तिने केलेले विधान सध्या खूप चर्चेत आले आहे. अलिकडेच करीना कपूरने हॉलिवूड रिपोर्टरसाठी अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)सोबत खास संवाद साधला. यादरम्यान दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले. या गप्पांमध्ये करीनाने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबतचे तिचे नाते कसे आहे हे देखील सांगितले.
करीना कपूर म्हणाली, 'आमचा बॉण्ड लव्ह अॅण्ड वॉरवाला आहे.' यानंतर विकीने विचारले की, "आता काय आहे? लव्ह अॅण्ड वॉर?" मग करीना हसली आणि म्हणाली, "आमच्या नात्यात नेहमीच चढ-उतार येतात आणि ते नेहमीच चालू राहते. पण मला वाटते की तू या बाबतीत भाग्यवान आहेस. कलाकार काय आहेत, चित्रपट कोणता असणार आहे. मला तुला एका प्रेमकथेत पहायचे आहे."
करीना आणि भन्साळी यांच्यातील वाद आहे खूप जुना
करीना कपूर आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील हा वाद वर्षानुवर्षे जुना आहे. करीनाने संजय लीला भन्साळी यांच्यावर आरोप केले होते आणि म्हटले होते की, तिला 'देवदास'मध्ये 'पारो'ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. त्यानंतर तिला न कळवता त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. असेही वृत्त आहे की करीना कपूरला 'गोलियों की रासलीला: रामलीला' मधूनही काढून टाकण्यात आले. तेव्हापासून दोघेही एकमेकांवर कमेंट्स करत राहतात.
'लव्ह अँड वॉर' कधी येणार भेटीला?
विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक प्रेमकथेवर आधारित ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी व्यतिरिक्त, रणबीर कपूर आणि आलिया भट देखील यात दिसणार आहेत.