शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:09 IST2025-08-04T16:09:12+5:302025-08-04T16:09:46+5:30
करण जोहर, शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची खूप जुनी मैत्री आहे. शाहरुख आणि राणीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी करण जोहरने खास पोस्ट लिहिली आहे.

शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
करण जोहर, शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची खूप जुनी मैत्री आहे. 'कुछ कुछ होता है','कभी खुशी कभी गम' सारखे सुंदर सिनेमे त्यांनी दिले. करण जोहर आणि शाहरुखच्या मैत्रीची तर मिसाल दिली जाते. दोघंही एकमेकांच्या चांगल्या वाईट काळात एकमेकांसाठी कायम उभे राहिले. शाहरुख खानला करिअरमधील ३३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला. सोबत त्याची मैत्रीण राणी मुखर्जीलाही बऱ्याच प्रतिक्षेनंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. आपल्या या दोन्ही खास मित्रांसाठी करण जोहरने (Karan Johar) खास पोस्ट लिहिली आहे.
करण जोहरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, " सेलिब्रेशन्समधून थोडा ब्रेक घेत माझ्या मित्रांच्या सिनेमातील कामगिरीवर बोलायचं आहे. एसआरके भाई, ३३ वर्षांचा हा काळ आहे आणि माझा ऊर अभिमानाने भरुन येतोय. तू केलेल्या प्रत्येक भूमिकेतून भारतीय सिनेमाची परिभाषा बदलत होती. जवान आणि इतर सर्व सिनेमे तू किती अपवादात्मक अभिनेता आहेस हे दाखवून देतो. आपल्या स्वॅगमध्ये तुझं स्क्रीनवर येणं, चार्मिंग आणि तुझी जस्ट srk ness...माझ्यासोबतच संपूर्ण जग तुझं कौतुक करत आहे, तुझा विजय साजरा करत आहे आणि तुला प्रत्येक पावलावर पाठिंबा देत आहे. तुझ्यासारखा कोणीच नाही, अभिनंदन भाई...तु यासाठी आणि याहून अधिक गोष्टींसाठी पात्र आहेस. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
तो पुढे लिहितो, "माझी प्रिय राणी...खरोखरंच तू स्क्रीनची राणी आहेस. तुझ्या अभिनयात प्रत्येक जण शेवटपर्यंत गुंतून राहतो. खूप कमी जणं हे करु शकतात पण तू.. तू यात नेहमीच सर्वोत्कृष्ट राहिलीस. अभिनंदन आणि मी सगळ्यांच्या वतीने हे सांगतोय...तू यापुढे तू आणखी काय जादू करतेस याची आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही."
मजेशीर गोष्ट म्हणजे, 'कुछ कुछ होता है' साठी मी माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार या दोघांसोबतच जिंकलो होतो आणि काजोल माझ्या बाजूला होती. आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झालं यालाच म्हणतात ना?"
शाहरुख खानने या पोस्टवर कमेंट करत लिहिले, "धन्यवाद भाई. माझ्या क्राफ्टमधील बऱ्याच गोष्टी मी तुझ्याकडून शिकलो. तसंच आयुष्यातही खूप शिकलो. अजूनही शिकत आहे. त्यामुळे तुझंही खूप खूप अभिनंदन..प्रेम एसआरके."