"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:32 IST2025-05-15T18:31:47+5:302025-05-15T18:32:18+5:30
सामान्य लोकांना इंडस्ट्रीबद्दल माहित नसलेल्या गोष्टी तिने उलगडल्या.

"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
कल्कि कोचलीन (Kalki Koechlin) हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा','ये जवानी है दिवानी' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये ती दिसली आहे. ती कमीत कमी सिनेमांमध्ये झळकली मात्र प्रत्येक वेळी तिचं वेगळेपण दिसून आलं. नुकतंच अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये मंदी आल्याचं वक्तव्य केलं आहे. असं का म्हणाली कल्कि वाचा...
aleena dissects ला दिलेल्या पॉडकास्टमध्ये कल्कि कोचलीनने बॉलिवूडवर भाष्य केलं. सामान्य लोकांना इंडस्ट्रीबद्दल माहित नसलेल्या गोष्टी तिने उलगडल्या. कल्कि म्हणाली, "बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे. तुम्हाला हे माहित होतं का? म्हणूनच तर जुने सिनेमे पुन्हा रिलीज केले जात आहेत. नवीन कंटेंटच येत नाहीए. जो येतोय तो फारसा चालत नाहीए. सगळं काही थांबलं आहे. सर्वांना याची कल्पना आहे मात्र ते घाबरुन आहेत. नक्की काय चाललंय कोणालाच कळेनासं झालं आहे."
ती पुढे म्हणाली, "इथे प्रत्येक जण काही ना काही त्रासातून जात आहे. मग तो सेटवरचा एखादा सामान्य कर्मचारी असो किंवा मग थेट निर्माता. जुन्या लोकांना काढून नवीन लोकांना घेतलं जात आहे. क्रिएटिव्ह टीम आता हटवण्यात आल्या आहेत. त्यांच्याजागी नवे लोक घेतले जात आहेत. कंटेंट का चालत नाही याचं गणित कोणालाच उलगडलेलं नाही. वरच्या पासून ते खालपर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे सुरु आहे. मी अनेकांशी चर्चा केली. सुमारे ७ सिनेमे आणि कोट्यवधि रुपये मार्केटमध्ये अडकले आहेत कारण त्यांना रिलीजसाठी प्लॅटफॉर्मच मिळत नाहीये. जे छोटे कलाकार आहेत त्यांच्याकडे तर २ वर्षांपासून काम नाहीये. आता तर काही मोठ्या कलाकारांकडेही काम नाहीए."
"आजकाल प्रेक्षकही एकाजागी बसून तीन तास सिनेमा पाहू शकत नाहीत. ते मध्येमध्ये मोबाईल बघतात. कंटेंट नीट पोहोचवला जात नाही. पण इंडस्ट्री लवकरच यातून बाहेर पडेल अशी मला खात्री आहे", असंही ती म्हणाली.