"पुरस्कार, मान, प्रतिष्ठा एकीकडे आणि एका मुलीचा बाप होणं..." जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:58 IST2025-07-20T10:43:07+5:302025-07-20T10:58:44+5:30

जितेंद्र जोशीने त्याची लेक रेवाच्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त केल्या आहेत.

Jitendra Joshi Emotional Post On Daughters Birthday | "पुरस्कार, मान, प्रतिष्ठा एकीकडे आणि एका मुलीचा बाप होणं..." जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

"पुरस्कार, मान, प्रतिष्ठा एकीकडे आणि एका मुलीचा बाप होणं..." जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीची ओळख आहे. जितेंद्रने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती मराठी सिनेविश्वाला दिल्या आहेत.  जितेंद्र जोशी त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. नुकतंच अभिनेत्यानं लेक रेवासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यानं रेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच 'एका मुलीचा बाप होणं' हेच खरं यश असल्याचं म्हटलं.

जितेंद्र जोशीने त्याची लेक रेवाच्या वाढदिवसानिमित्त भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्रने रेवाचे काही फोटो पोस्ट करत लिहलं, "पहिल्या चित्रफितीमध्ये इच्छा आणि शेवटच्या छायाचित्रात वास्तव आहे. दोन्हींच्या मध्ये काळ एकेका क्षणाचा दिवस, दिवसाचा आठवडा, महिना, वर्ष बनून / बदलून सरताना मनात मात्र काही क्षण रेंगाळत राहतात. मुलगी जन्माला आली की, नवा श्वास मिळतो, छातीचा भाता आणखी मोठ्ठा होतो. स्वप्नातसुद्धा वाटणार नाही अशा गोष्टी आयुष्यात घडतात. काम, पुरस्कार, मान, प्रतिष्ठा सगळं एकीकडे आणि एका मुलीचा बाप होणं एकीकडे".

पुढे त्यानं लिहलं, "पालक होण्याचं सुख आपल्याला मुलंच देतात. आपल्यालाही ते घेता आलं पाहिजे. मुलांच्या वयाइतकंच पालकांचं वय असतं हे आपणसुद्धा ओळखलं पाहिजे. मुलं पालकांना जबाबदारी शिकवतात. नवीन विचार देतात. मुलांचा वाढदिवस म्हणजे पालकांचाही जन्मदिवस. मुलं वाढतातच, पण पालकसुद्धा मोठे होतात. ते शहाणे झाले तर उत्तमच! पण मुलांना, मोठी होऊ नकोस, तशीच राहा वगैरे नको बालिशपणा! त्यापेक्षा मस्त जे वाटेल, जो वाट्टेल तो रस्ता मुलांना धरू द्यावा आणि जमलंच तर साथ द्यावी. १५ वर्षं अशी बघता बघता निघून गेली. पुढचीसुद्धा जातील. जन्मदिन चिरायू होवो! वाढदिवसाच्या शुभेच्छा", या शब्दात अभिनेत्यानं लेकीवरील प्रेम व्यक्त केलंय. जितेंद्रच्या पोस्टवर लेक रेवानं 'लव्ह यू बाबा' अशी कमेंट केली. 


Web Title: Jitendra Joshi Emotional Post On Daughters Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.