"थिएटरमधला रिस्पॉन्स ऐकून तर भारी वाटतच होतं, पण...", प्रियदर्शनी इंदलकरनं केलं 'गुलकंद'चं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 10:01 IST2025-05-06T10:01:08+5:302025-05-06T10:01:52+5:30
Gulkand Movie : प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट गुलकंद अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

"थिएटरमधला रिस्पॉन्स ऐकून तर भारी वाटतच होतं, पण...", प्रियदर्शनी इंदलकरनं केलं 'गुलकंद'चं कौतुक
प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट 'गुलकंद' (Gulkand Movie) अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात हे कलाकार या सिनेमात आहेत. दरम्यान, अलिकडेच हास्यजत्रेतील त्यांची सहकलाकार प्रियदर्शनी इंदलकर हिने गुलकंद हा सिनेमा पाहिला आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
प्रियदर्शनी इंदलकर हिने थिएटरमध्ये सिनेमा पाहत असताना स्क्रीनवरील प्रत्येक कलाकाराचे फोटो शेअर करत त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. याशिवाय तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, सगळंच छान आहे या सिनेमाचं ! लेखन, दिग्दर्शन, बॅकग्राउंड म्युझिक, गाणी, अभिनय !! आणि टॅगलाइनप्रमाणे मी खरंच कुटुंबासोबत डेटवर गेले ! प्रीमियरला सिनेमा पाहून सुद्धा, पुन्हा पाहताना अजून मजा आली. थिएटरमधला रिस्पॉन्स ऐकून तर भारी वाटतच होतं, पण जवळच्या माणसांना मोठ्या पडद्यावर पाहण्यात वेगळीच गंमत आहे ! गुलकंद टीमचे अभिनंदन!! मराठी सिनेमासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये यायला भाग पाडल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन!
'गुलकंद'ने केली इतकी कमाई
गुलकंद हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ पाहायला मिळतो. सॅकनिल्क रिपोर्टनुसार 'गुलकंद' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५ लाख रुपये, दुसऱ्या दिवशी २५ लाख तर तिसऱ्या दिवशी ४२ लाखांची कमाई केली. त्याचबरोबर वीकेंडचा या चित्रपटाला मोठा फायदा झाला. रविवारी म्हणजे चौथ्या दिवशी 'गुलकंद' सिनेमाने ५७ लाखांची कमाई केली आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने १ कोटी ७९ लाखांची दमदार कमाई केली आहे.