"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:24 IST2025-10-04T17:23:31+5:302025-10-04T17:24:07+5:30
Priya Berde : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचं ३ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
प्रिया बेर्डे यांनी 'नवरंग' सिनेमाचं पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिलं की, ''संध्या बाई गेल्या, खरंतर नात्यानं त्या माझ्या आज्जी लागतात.. लहानपणापासून मी त्यांची जबरदस्त फॅन होते आणि आहे, त्यांच नृत्य, त्यांचे कॉश्चुम्स, त्यांचं मेकअप सगळं सगळं मला खूप आवडायचं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी मधलं माझ्या डोळ्यात कचरा गेला ह्या गाण्यावर मी नाच करून दाखवायची, हातात कपबशीची चवड लावून पण त्यांचं एक गाणं होतं ते पण मी करायची आणि घरातल्या कपबश्या फोडल्यात आणि आईचे फटके खाल्लेत,कागदाचे कपटे उडवून घरभर केले होते तेव्हा आई झाडू घेऊन माझ्या मागे लागल्याचं आठवतंय, फक्त आधा है चंद्रमा मी काही करू शकले नाही नाहीतर आईने माझं डोकंच फोडलं असतं, माझं डान्सच्या बाबतीतलं खरं इन्स्पिरेशन संध्या बाईच होत्या केवढा जबरदस्त पगडा होता त्यांचा माझ्या मनावर..''
त्यांनी पुढे म्हटलं की, ''त्यांची माझी भेट शेम टू शेमच्या डबिंगच्या वेळी झाली होती, त्या फिल्ममध्ये एक पॅरीडी सॉंग होतं त्यात संध्या बाईंची मी थोडी नक्कल केली होती, त्या नाचताना फार मान हलवायच्या ते मी केलं होतं आणि बाई गाणं पहायला आल्या मला अक्षरशः घाम फुटला होता एकतर मी त्यांची जबरदस्त फॅन आणि त्यात मी अशी केलेली नक्कल.. कसं असतं ती नक्कल चेष्टा वाटू नये एवढीच अपेक्षा होती पण समोरची व्यक्ती ते बघून नक्की काय विचार करेल हे माहीत नव्हतं.. पण त्यांना जर ते आवडलं नाही तर मी त्यांचे पाय धरून माफी मागायची ही तयारी ठेवली होती पण त्यांनी माझं खूप कौतुक केलं आजच्या काळातली तू उत्तम नर्तिका आहेस ह्या शब्दात कौतुक केलं, काय भारी वाटलं होतं मला.. त्यानंतर त्यांना भेटायचा खूप प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही, त्या कुणालाही भेटत नाहीत असं सांगण्यात आलं. त्यावेळी राजकमल स्टुडिओत शांताराम बापूंनी त्यांच्या सगळ्या चित्रपटातल्या फर्निचरचं, कॉस्च्युमचं आणि दागिन्यांचं खूप मोठं म्युझियम केलं होतं ते मी आवर्जून पाहायला गेले होते, काय अप्रतिम होते.. अगदी "स्त्री" या चित्रपटापासून ते "चंदनाची चोळी".. पर्यंत च्या गोष्टी तिथे होत्या, एवढेच काय मी "अशी ही बनवाबनवी" च्या "हृदयी वसंत फुलताना" या गाण्यातली साडी सुद्धा संध्या बाईंनी चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटात वापरलेलीच घातली आहे.. मला त्यावेळी ते किती अप्रूप होतं, त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती..''
''अत्यंत मेहनती व मनस्वी कलाकार जल बिन मछली नृत्य बिन बिजलीच्या वेळी त्यांचा एका छोट्या प्लॅटफॉर्म वरून कुबड्या घेऊन डान्स होता, पण नाचताना अंदाज चुकला आणि बाई डायरेक्ट खाली.. गुडघे फुटले ६ महिने अंथरूण धरलं, गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी नाचायला मनाई केली, पण बाईंनी कुणाचंही न ऐकलं.'', असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.