महाराष्ट्रात जन्मल्याने स्वतःला नशीबवान मानतो; पद्मश्री अशोक सराफ यांचं प्रतिपादन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:32 IST2025-04-22T06:31:58+5:302025-04-22T06:32:22+5:30

‘एप्रिल मे ९९’ या अप्रदर्शित सिनेमाने चित्रपताका महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

I consider myself lucky to be born in Maharashtra; Padma Shri Ashok Saraf assertion | महाराष्ट्रात जन्मल्याने स्वतःला नशीबवान मानतो; पद्मश्री अशोक सराफ यांचं प्रतिपादन  

महाराष्ट्रात जन्मल्याने स्वतःला नशीबवान मानतो; पद्मश्री अशोक सराफ यांचं प्रतिपादन  

मुंबई : चित्रपताका महोत्सव मराठी सिनेसृष्टीसाठी फायदेशीर ठरेल. मी खूप नशीबवान आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला. इथे कलेला जास्त महत्त्व आहे. लोकांना कलेची समजही आहे. लोकांनी मला वरच्या पदाला नेऊन ठेवले आहे. मी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हे फळ आहे. तुम्हाला आनंद देण्यासाठी काम करतच राहीन, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांनी चित्रपताका महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चित्रपताका’ महोत्सव सुरू झाला. 

‘एप्रिल मे ९९’ने प्रारंभ 
‘एप्रिल मे ९९’ या अप्रदर्शित सिनेमाने चित्रपताका महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन वर्षांतील महत्त्वाचे ४१ चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र शासनाची ऑडिशन योजना रविंद्र नाट्य मंदिरमध्ये सुरू करण्यात आली आहे. 

रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, डॉ. जब्बार पटेल, किरण शांताराम, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, फिल्मसिटीच्या एमडी स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

आज पहिला आंतराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. ११२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ऑलिंपियाडमध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या मराठी सिनेमाचा प्रीमियर झाला होता याचे स्मरण मंत्री आशिष शेलार यांनी करून दिले. चित्रपताका हा मराठी चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा आहे. आजच्या कालखंडात दादासाहेब फाळकेंची सिनेसृष्टीला गरज असल्याचेही ते म्हणाले. मराठीत बनलेले दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाहीत. ते दाखवण्याच्या विचारांतून या चित्रपट महोत्सवाची संकल्पना पुढे आल्याचे पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले. 

Web Title: I consider myself lucky to be born in Maharashtra; Padma Shri Ashok Saraf assertion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.