हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:49 IST2025-09-02T08:47:17+5:302025-09-02T08:49:58+5:30
हेमा मालिनी यांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर केली मोठी खरेदी

हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर नुकतीच आलिशान नवीकोरी कार घेतली आहे. कारची पूजा करतानाचा त्यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. विशेष म्हणजे त्यांनी आधी मुंबईतील कोट्यवधींचे दोन फ्लॅट विकले. यातून त्यांची जी कमाई झाली त्याचा आकडा वाचून थक्क व्हाल. त्यातच आता कार खरेदी केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. ड्रीम गर्ल अशी ओळख असलेल्या हेमा मालिनी वयाच्या ७६ व्या वर्षीही तितक्याच अॅक्टिव्ह आहेत.
हेमा मालिनी यांनी अंधेरी पश्चिम मध्ये ओशिवरा येथील दोन फ्लॅट्सची विक्री केली. यातून त्यांची १२.५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. स्क्वेअर यार्ड्स नुसार, ऑगस्ट महिन्यातच त्यांनी डील केली. दोन्ही फ्लॅट्स हे ओबेरॉय स्प्रिंग्स येथील आहेत. एक ८४७ चौरस फूट आणि दुसरा १०१७ चौरस फुटांचा आहे. दोन्ही फ्लॅट्सना एक एक कार पार्किंग स्पेसही होती. प्रत्येकी फ्लॅटची किंमत ६.२५ कोटी रुपये होती. या डीलसाठी हेमा मालिनी आंनी ३१.२५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस दिली.
यानंतर आता हेमा मालिनी यांनी नुकतीच ७५ लाख किंमतीची एमजी एम 9 ही आलिशान कार खरेदी केली. त्यांनी रीतसर कारची पूजा केली. ड्रायव्हिंग सीटवर बसून पोजही दिली. गणेशोत्सवाच्या शुभ मुहुर्तावर त्यांच्या घरी नवीकोरी कार आली. कारसोबतचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती ही १२२ कोटी आहे. त्यांच्याजवळ आधीपासून ६१ लाखांच्या कार आहे. आता आणखी एक लक्झरी कार सामील झाली आहे. तसंच त्यांच्या मुंबईतील राहत्या घराची किंमत १११ कोटी रुपये आहे. हेमा मालिनी या लोकसभा सदस्यही आहेत. मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा त्या विजयी झाल्या आहेत.