Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

By ऋचा वझे | Updated: July 9, 2025 14:11 IST2025-07-09T14:09:07+5:302025-07-09T14:11:33+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? ब्रेक का घेतला? 'चला हवा येऊ द्या' मध्ये कशी एन्ट्री झाली? असे अनेक प्रश्न; गौरव मोरेची 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत

gaurav more talks about chala hawa yeu dya new show also why he left maharashtrachi hasyajatra | Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

फिल्टरपाडा टा ना टा ना... म्हटलं की गौरव मोरे (Gaurav More) डोळ्यासमोर येतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे तो स्टार झाला आणि घराघरात पोचला. गौरवने वर्षभरापूर्वीच हास्यजत्रा सोडली. आता तो पुन्हा नव्या ढंगात कॉमेडी करण्यासाठी सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)च्या नवीन पर्वात गौरव दिसणार आहे. यानिमित्त त्याने 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधला. 

'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात कशी एन्ट्री झाली? 

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने १० वर्ष महाराष्ट्राला हसवलं आहे. मीही या कार्यक्रमाचा मोठा चाहता होतो. सर्वात जास्त टीआरपी मिळवणारा हा शो होता. मला 'चला हवा येऊ द्या' बद्दल विचारण्यात आलं. नव्या फॉर्मॅटमध्ये हा शो असणार आहे म्हटल्यावर मीही विचार केला की करायला हरकत नाही. ऑडिशन प्रोसेस सुरु झाली, मीटिंग झाली आणि माझी नव्या पर्वात एन्ट्री झाली.  

कार्यक्रमाच्या या नवीन प्रवासाबद्दल काय सांगशील?

'चला हवा येऊ द्या'च्या आधीच्या पर्वात मी नव्हतोच. आता मी यामध्ये नवीन खेळाडून म्हणून जात आहे. आता माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. नवं वर्ष, नवीन चॅनल, नवी माणसं त्यामुळे माझी शून्यातून सुरुवात होणार आहे.  फ्रेश सुरुवात असं मी म्हणेन. त्याच हिशोबाने मला काम करावं लागेल. लोक मला ओळखतात, सगळं चालून जाईल असा विचार करुन चालत नाही.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचा निर्णय का घेतला होता?  कार्यक्रम सोडल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती?

कोरोना काळात हास्यजत्रेला लोकांनी खूप उचलून धरलं. मग आम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. ५ वर्ष काम केल्यानंतर अभिनयाबाबतीत, इतर गोष्टींबाबतीत माझ्याकडून तोचतोचपणा आला होता. कंफर्ट झोन आला होता. माझ्याकडून काहीही वेगळं घडत नव्हतं. ५ वर्ष झाली आहेत तर आपण स्वत:साठी ब्रेक घेतला पाहिजे असं वाटलं. तेव्हा मी तो ब्रेक घेतला. या दरम्यान 'मॅडनेस मचाएंगे' ही हिंदी मालिका केली. मधले काही वर्ष मी कोणताही कॉमेडी शो केला नाही. 

मी कार्यक्रम सोडणार हे कळल्यावर सर्वांनी जाऊ नको अशीच प्रतिक्रिया दिली. जायला नव्हतं पाहिजेस, थांबायला हवं होतंस असंच ते म्हणाले. सचिन मोटे, सचिन गोस्वावी सर म्हणाले होते की विचार कर. पण मी म्हणालो, 'तोचतोचपणा आलाय त्यामुळे मी जात आहे.' मग तेही म्हणाले हरकत नाही. पण मी फक्त तो शो सोडला. मित्र सोडले नाहीत. सगळे आपापल्या कामात व्यग्र आहेत. आजही आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा छानच भेटतो. 

श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांच्यासोबत कसं बाँडिंग आहे?

श्रेया, कुशल हे तर माझे  मित्रच आहेत. दोघंही मला सीनिअर आहेत. पण वय महत्वाचं नाही. तुम्ही किती दिसता, काम करता हे महत्वाचं आहे. श्रेया कामाच्या बाबतीत आम्हाला सीनिअर आहे. ती खूप आधी महाराष्ट्रभर पोहोचली होती. तिने थिएटरही केलं आहे. कुशल तर किती मेहनत करुन इथपर्यंत पोहोचला आहे हेही सगळ्यांना माहितच आहे. दोघांसोबत काम करायला मजा येत आहे. 

कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी स्वत:साठी काही नियम ठरवले आहेत का? 

मी काही गोष्टी त्यांना स्पष्ट सांगितल्या आहेत. अजून असं काही ठरलेलं नाही. कलाकार म्हणून माझ्या काही गोष्टी आहेत, मला असं असं हवं आहे का, अमुक करु शकतो असं मी त्यांना विचारलं. झी चा प्रेक्षक वर्ग कसा आहे, त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे बघण्यासाठी मला महिना-दोन महिने तरी लागतील. त्यानंतरच मला अंदाज येईल. लोकांना काय पटतंय काय नाही हे मी बघेन. मग जे पटतंय त्या गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा मी प्रयत्न करेन. दिग्दर्शकाला काय आवडतंय, चॅनलला काय हवंय, प्रेक्षकांना काय पाहायचंय, तीच गोष्ट लेखक कशा पद्धतीने लिहित आहेत याचं निरीक्षण करुन मला तशा पद्धतीने काम करावं लागेल. यासाठी एक-दोन महिने जातील.  करायचं तर विनोदी कामच आहे. पण त्यातही प्रत्येकाचे विचार आणि मानसिकता पाहून मला काम करावं लागेल. 

आज तुझं काम पाहून तुला महाराष्ट्रभरातून कशा प्रतिक्रिया येतात?

लोक भेटतात, हास्यजत्रेत मिस करतो म्हणतात. कोव्हिडमध्ये त्यांना आमचा खूप आधार मिळाला होता. अनेक लोक थांबून फोटो काढतात तेव्हाही बरं वाटतं. फिल्टरपाड्याला तर अभिमानच आहे की मी त्यांचा पोरगा आहे. आमच्या गावाचा पोरगा, फिल्टरपाड्याला तुझ्यामुळे ओळख मिळाली असं म्हणतात.


कॉमेडी करायची हे आधीच ठरवलं होतंस का?

कॉमेडी करायची असं ठरवता येत नाही. ती होते. ती थोडीफार जमते. कॉमेडी करणं अवघड आहे. ते प्रत्येकाला जमत नाही. कॉमेडीसाठी सगळं जुळूनही यावं लागतं. ते सगळं टायमिंगचं गणित असतं. टायमिंग, सहकलाकार सगळं जुळून येणं गरजेचं आहे. ते जर जुळून आलं नाही तर गणित लगेच फसतं. अलर्ट राहणं गरजेचं आहे. आजूबाजूचं वातावरण, मित्रांमधली मजा मस्ती, विनोदी सिनेमे बघणं यातून ते झालं. हसण्याने आयुष्य वाढतं त्यामुळे मला कॉमेडी करायला आवडतं. 

तुझे आणखी आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत? हिंदीतही दिसणार आहे का?

आयुष शर्मासोबत मी एक सिनेमा करत आहे. आणखी एक-दोन सिनेमे लाईन अप आहेत. एक मराठी सिनेमा आहे ज्याचं शूट नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. 

Web Title: gaurav more talks about chala hawa yeu dya new show also why he left maharashtrachi hasyajatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.