एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:17 IST2025-10-03T12:15:17+5:302025-10-03T12:17:07+5:30
First AI Actress Tilly Norwood: एआयपासून बनलेल्या अभिनेत्रीने मनोरंजन क्षेत्रात एन्ट्री घेतल्याने हॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावण्यासाठी लाखो कलाकार जीवाचे रान करतात, अशातच एका एआय अवतार अभिनेत्रीने मनोरंजन क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. लंडनस्थित पार्टिकल ६ स्टुडिओजच्या झिकोइया नावाच्या नवीन कंपनीने 'टिली नॉरवुड' नावाचा एआय अवतार तयार केला आहे, ज्याला हॉलिवूडची पहिली एआय अभिनेत्री म्हणून संबोधित करण्यात आले. झुरिच फिल्म फेस्टिव्हलमध्ये याबाबत घोषणा केली आहे. मात्र, यामुळे हॉलिवूडमधील कलाकारांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
डच निर्माती इलेन व्हॅन डेर वेल्डेन यांनी सांगितले की, एका टॅलेंट एजन्सीने टिली नॉरवुडला क्लायंट म्हणून साइन केले आहे आणि ती लवकरच एका चित्रपटावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. टिलीचे स्वतःचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि तिने आधीच ३३ हजार फॉलोअर्स मिळवले आहेत. या अकाउंटवर ती कॉफी पिताना, खरेदी करताना आणि स्क्रीन टेस्टची तयारी करतानाचे फोटो पोस्ट करते.
दरम्यान, हॉलिवूडमधील कलाकारांनी टिली नॉरवुडला अभिनेत्री म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. मेलिसा बरेरा यांनी याला चुकीचे म्हटले असून, कलाकारांनी टॅलेंट एजन्सीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. नताशा लिओन यांनी याला एक 'कठोर पाऊल' असल्याचे म्हटले आहे.
स्क्रीन अॅक्टर्स गिल्डने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली. "टिली नॉरवुड ही अभिनेत्री नसून, व्यावसायिक कलाकारांच्या परवानगीशिवाय तयार केलेला केवळ एआय अवतार आहे. टिलीला जीवनाचा अनुभव नाही किंवा तिचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये तिला रस नाही", असे तिने म्हटले.