चित्रपट निर्माते, शिवसेनेचे माजी खासदार प्रितीश नंदी यांचं हृदयविकाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 23:02 IST2025-01-08T23:01:04+5:302025-01-08T23:02:09+5:30
शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी समाजातील विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे योगदान दिले.

चित्रपट निर्माते, शिवसेनेचे माजी खासदार प्रितीश नंदी यांचं हृदयविकाराने निधन
मुंबई - प्रख्यात कवी, लेखक, पत्रकार आणि चित्रपट निर्माता प्रितीश नंदी यांचे बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी निधन झालं. वयाच्या ७३ व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रितीश नंदी यांचा जन्म १५ जानेवारी १९५१ रोजी बिहार राज्यातील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या काव्यलेखनाच्या आणि पत्रकारितेच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया', 'द इंडिपेंडंट' आणि 'फिल्मफेअर' यांसारख्या प्रतिष्ठित मासिकांचे संपादन त्यांनी केलं. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आदर आणि प्रतिष्ठा मिळाली होती. राजकारणातही प्रितीश नंदी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ते शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी समाजातील विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे योगदान दिले.
चित्रपट निर्मिती क्षेत्रातही प्रितीश नंदी यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 'सूर', 'कांटे', 'झंकार बीट्स', 'चमेली', 'हजारों ख्वाइशें ऐसी', 'प्यार के साइड इफेक्ट्स' यांसारख्या ४० हून अधिक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या 'फोर मोअर शॉट्स प्लीज' आणि 'मॉडर्न लव्ह मुंबई' यांसारख्या लोकप्रिय वेबसीरिजही मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या. प्रितीश नंदी यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने काव्य आणि साहित्य प्रेमींमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी प्रीतीश नंदी यांच्या निधनाबद्दल इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं की, माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक प्रीतिश नंदी यांचं निधन झाल्याचे ऐकून मला खूप दुःख झालं आणि धक्का बसला. ते एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि निर्भयी पत्रकार होते. माझी सपोर्ट सिस्टीम आणि माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शक्तीचा एक मोठा स्रोत होते असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्यात अनेक गोष्टी सामायिक होत्या. मला भेटलेल्या सर्वात निडर माणसांपैकी ते एक होते. नेहमीच मोठे मन आणि मोठी स्वप् पाहणारी व्यक्ती होती. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. अलीकडच्या काळात आमच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या, पण एक काळ असा होता की आम्ही कधीच वेगळे झालो नव्हतो. जेव्हा त्यांनी मला फिल्मफेअरच्या मुखपृष्ठावर आणि मुख्य म्हणजे द इलस्ट्रेटेड वीकलीवर स्थान देऊन आश्चर्यचकित केले तो क्षण मी कधीच विसरत नाही. तो खरोखरच 'मित्रांचा मित्र' होता असंही अनुपम खेर यांनी म्हटलं.