२४ वर्षीय कोरियन फिल्म अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:30 IST2025-02-17T08:29:53+5:302025-02-17T08:30:37+5:30
किम से रॉनने २००९ साली बाल अभिनेत्री म्हणून सिनेमात पदार्पण केले होते परंतु किमला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी २०२३ साली नेटफिल्क्सवर आलेल्या वेबसीरीज BloodHounds यामुळे मिळाली

२४ वर्षीय कोरियन फिल्म अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह
साऊथ कोरियन इंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री Kim Sae Ron हीचा वयाच्या २४ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. १६ फेब्रुवारीला अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. तिचा मृत्यू कसा झाला याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करून माहिती गोळा करत आहेत. एका जवळच्या व्यक्तीने कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
न्यूज वेबसाईट द कोरियन हेराल्डनुसार, अभिनेत्री Kim Sae Ron ही तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याचं पोलिसांनी पुष्टी दिली. अभिनेत्रीच्या मित्राने भारतीय वेळेप्रमाणे दुपारी १.२० च्या सुमारास पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. अभिनेत्रीचा मृत्यू संशयास्पद असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. किमचा मृत्यू कशामुळे झाला, घरात तिच्याशिवाय आणखी कुणी होते का, तिच्यावर कुठली जोर जबरदस्ती करण्यात आली होती का यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. अभिनेत्रीच्या अंगावर कुठल्याही खूणा दिसत नसल्याचं पोलिसांनी सांगितले.
कोण होती Kim Sae Ron?
किम से रॉन ही कोरियन ड्रामा सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने Listen to My Heart, The Queen's Classroom, Hi-School Love On सारख्या कोरियन ड्रामा सिनेमात काम केले होते. ज्यातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. किम से रॉनने २००९ साली बाल अभिनेत्री म्हणून सिनेमात पदार्पण केले होते परंतु किमला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी २०२३ साली नेटफिल्क्सवर आलेल्या वेबसीरीज BloodHounds यामुळे मिळाली. तिने या वेबसीरिजमध्ये Cha Hyeon Ju नावाची भूमिका साकारली आहे.
अलीकडेच या वेबसीरिजचा दुसरा भाग आला असून त्यात किम दिसत नाही. २०२२ साली किम से रॉन एका वादात अडकली होती. तिला सियोल इथल्या हाय प्रोफाईल ड्रिंक अँन्ड ड्राईव्ह गुन्ह्यात पकडले होते. त्यामुळे तिच्या संपत्तीवर खूप परिणाम झाला. कायदेशीर कचाट्यातून तिला जावे लागले. या संपूर्ण घटनेनंतर किमने लोकांची जाहीर माफी मागितली होती आणि काही काळ तिने अभिनय क्षेत्रातूनही ब्रेक घेतला होता. या सर्व घडामोडीत किमला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यात अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. किमच्या जाण्याने कोरियन फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.