परीक्षांनी चित्रपटांना लावला ब्रेक! मार्चमध्ये केवळ एकच मराठी चित्रपट प्रदर्शित

By संजय घावरे | Updated: March 19, 2023 12:13 IST2023-03-19T12:13:36+5:302023-03-19T12:13:54+5:30

मार्चमधील परीक्षांच्या काळात यंदाही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस न केल्याने पुन्हा एकदा परीक्षांनी मराठी सिनेमांना जणू ब्रेकच लावला आहे. 

Exams break the movies! Only one Marathi film released in March | परीक्षांनी चित्रपटांना लावला ब्रेक! मार्चमध्ये केवळ एकच मराठी चित्रपट प्रदर्शित

परीक्षांनी चित्रपटांना लावला ब्रेक! मार्चमध्ये केवळ एकच मराठी चित्रपट प्रदर्शित

- संजय घावरे 

मुंबई : मार्चमध्ये प्रदर्शित झालेला ‘तू झूठी मैं मक्कार’ एकीकडे १०० कोटींच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे या महिन्यात एकच मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून, दुसरा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मार्चमधील परीक्षांच्या काळात यंदाही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस न केल्याने पुन्हा एकदा परीक्षांनी मराठी सिनेमांना जणू ब्रेकच लावला आहे. 

दरवर्षी परीक्षा आल्या की मराठी चित्रपट बॅकफूटवर जातात. याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ‘वेड’ने धडाकेबाज व्यवसाय केला. ३ मार्चला ‘रौंदळ’ प्रदर्शित झाला असून २२ मार्चला ‘फुलराणी’ प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण भागात धुमाकूळ घालत ‘रौंदळ’ने साडे आठ कोटींचा व्यवसाय केला. २०२२ मध्ये फेब्रुवारीत १३, तर एप्रिलमध्ये नऊ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते; पण मार्चमध्ये केवळ दोनच चित्रपट आले. २०२१ मध्ये कोरोनाची झळ बसूनही फेब्रुवारीत पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर थिएटर्स बंद होती. एकूणच परीक्षांच्या काळात केवळ मराठीच नव्हे, तर मोठे हिंदी चित्रपटही प्रदर्शित होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

ग्रामीण भागांमध्ये परीक्षांच्या काळात त्यांचा बराच वेळ प्रवासात जातो. गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत महाराष्ट्रात विविध ठिकाणी जत्रा असतात. त्यापूर्वी परीक्षा संपविण्याकडे कल असतो. त्यामुळे गुढीपाडव्यापूर्वी चित्रपट प्रदर्शित करण्याकडे निर्मात्यांचाही कल नसतो. गुढीपाडव्यानंतर शेतीची कामेही बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने शेतकरीही रिकामा असतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या उड्या पडतील. एप्रिलमध्ये सहा मराठी चित्रपट येणार आहेत.

हॅालिवूडपटांचीही माघार कोरोनापूर्वी मार्चमध्ये हॅालिवूडपट भारतात प्रदर्शित करायचे. पण या काळात चित्रपटांना फटका बसल्याने ते देखील मार्चमध्ये भारतात चित्रपट प्रदर्शित करायला धजावत नाहीत. गेल्यावर्षी 'फास्ट ॲन्ड फ्युरिअस ७' या चित्रपटानेही मार्चमध्ये रिलीज करणे टाळले होते.

मार्चमध्ये कमी मराठी चित्रपट रिलीज होत असल्याने सिनेमागृहांचे आर्थिक गणित कोलमडते. कलेक्शन घटल्याने नुकसान होतेच; पण इतर भाषेतील चित्रपट सुरू असतात. कंटेंट चांगला असेल तर तो कधीही चालतो. वर्षभराचे प्लॅनिंग करून चांगल्या कंटेंटचे चित्रपट या काळात यायला हवेत. परीक्षा संपल्यावर चित्रपटांची लाट येते व शोज मिळणे अवघड होते.
- विक्रम भोसले, 
शाहू सिनेमागृह, कोल्हापूर

परीक्षांमुळे विद्यार्थ्यांसोबत पालकही मनोरंजनाकडे पाठ फिरवितात. परीक्षांसोबतच दरवर्षी गणपती, पावसाळ्यात असेच काहीसे वातावरण असते. त्यामुळे मराठी निर्माते चित्रपट रिलीज करायला धजावत नाहीत. यंदाही दोन मोठ्या चित्रपटांपैकी ‘रौंदळ’ रिलीज झाला आहे आणि ‘फुलराणी’ येणार आहे.
- समीर दीक्षित, 
वितरक, पिकल एन्टरटेन्मेंट

हिंदी चित्रपटही थंडावले
    या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॅार्वे’ने पहिल्या दिवशी १.२७ कोटी, तर ‘झ्विगाटो’ने केवळ ४२ लाखांचा गल्ला जमविला आहे. 
    पुढील आठवड्यात कोणताही मोठा हिंदी चित्रपट रिलीज होणार नसून, ३० मार्चला अजय देवगणचा ‘भोला’ येणार आहे.

Web Title: Exams break the movies! Only one Marathi film released in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा