गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..." 

By अमेय गोगटे | Published: August 2, 2022 05:04 PM2022-08-02T17:04:27+5:302022-08-02T17:06:09+5:30

सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असलेला "एकदा काय झालं..." हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय.

ekda kay zala marathi movie sumeet raghavan urmila kothare pushkar shrotri saleel kulkarni | गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..." 

गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..." 

googlenewsNext

गोष्टी ऐकायला, वाचायला सगळ्यांनाच आवडतं. गोष्टी आपल्याला घडवत असतात. पण, त्यासाठी ती गोष्ट तितकीच प्रभावीपणे सांगितलीही जायला हवी. अशाच गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट म्हणजे, "एकदा काय झालं...". सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त त्यातील कलाकार सुमीत राघवन, ऊर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री आणि बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्याशी मारलेल्या गप्पा. 

* गोष्टीभोवती गुंफलेल्या या सिनेमाची गोष्ट ऐकायला आवडेल!

सुमीतः माझं किरण नावाचं पात्र आहे. त्याची नंदनवन नावाची शाळा असते. मुलांना पाठ्यपुस्तकातून बाहेर काढून वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं त्याचं स्वप्न आहे. आपला स्वातंत्र्यसंग्राम असो किंवा फ्रेंच राज्यक्रांती; ती मुलांना गोष्टींच्या मार्फत सांगायची, म्हणजे ती त्यांच्या कायम लक्षात राहील, असा प्रयोग तो या शाळेत करतो. कारण, एकदा का गोष्ट कळली की त्याचं तात्पर्यं सांगायची गरज उरत नाही. त्या अनुषंगाने, बारीक बारीक गोष्टी या सिनेमात पेरल्यात. यात किरणचे आई-वडील आहेत, बायको डॉक्टर आहे, मुलगा चिंतन आणि त्याचं खास नातं आहे, शाळेतली मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत. यातील कुठल्या ना कुठल्या पात्राशी तुम्ही स्वतःला रिलेट करू शकाल.

* 'जिजा'ची आई म्हणून, एक पालक म्हणून हा सिनेमा करताना तुझा अनुभव कसा होता?

ऊर्मिलाः माझ्यासाठी हा सिनेमा खरोखरच एक वर्कशॉप ठरला. या सिनेमात मी चिंतनची आई आहे. मी गोष्ट ऐकली, शूटिंग सुरू झालं, तेव्हा माझी मुलगी जिजा दीड वर्षाची होती.  त्यामुळे तिला गोष्टी सांगायला हळूहळू सुरुवात झाली होती. तिला कुठली गोष्ट सांगायची, ती कशा पद्धतीनं सांगायची, तिला शिस्त कशी लावायची - ओरडायचं की गोड बोलून समजवायचं, हे सगळं सिनेमाच्या प्रोसेसमधून माझ्यासाठीही सोपं झालं. या सिनेमात किरण जे करतो, ते मी जिजासोबत करून पाहिलंय आणि ते परिणामकारकही ठरलंय. 

* ट्रेलरमध्ये तू सुमीतवर चिडल्याचा सीन आहे. तुझ्या भूमिकेबद्दल...

पुष्करः माझ्या व्यक्तिरेखेचं नाव जय आहे. किरणचा मित्र. एकदम प्रॅक्टिकल विचारांचा माणूस. त्याची मतं किरणपेक्षा वेगळी आहेत. गोष्टी सांगणं, शाळा वगैरे सगळं ठीक आहे, पण ग्रँट कशी मिळवायची, पैसे कसे कमवायचे हे त्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील एका घटनेमुळे तो थोडा अस्वस्थ आहे. त्याच्यात एक कडवटपणा आला आहे. तो आनंदाने हसत नाही, गप्पांमध्ये रमत नाही. अशी भूमिका मी बऱ्याच वर्षांनतर करतोय. प्रॅक्टिकल असणं बरोबर असलं, पैसे कमावणं गरजेचं असलं, तरी आयुष्याचं संचित हे आपण मिळवलेली माणसंच आहे, हे त्याला शेवटी जाणवतं.

* नेमका काय संदेश आहे? 

सुमीतः असा काही ठरवून मेसेज वगैरे द्यायचा नाहीए. पण, गोष्टी महत्त्वाच्या आहेत, संस्कार महत्त्वाचे आहेत, आजी-आजोबांशी होणारा संवाद महत्त्वाचा आहे, हे सांगायचा प्रयत्न आहे. आज छोट्या कुटुंबात सगळेच मोबाईलमध्ये गुंतलेत. पण, मोबाईल बघण्यापेक्षा डोळ्यात बघून बोलणं आणि हे नेटवर्क जोडणं गरजेचं आहे.  
 
पुष्करः 'फाईव्ह जी' पेक्षा 'आजी' जास्त महत्त्वाची आहे.  

* तू किती गोष्टी ऐकल्यास, कशी धमाल केलीस?

अर्जुनः हे सगळे खूपच मोठे कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं. गोष्टींचा सिनेमा असल्यामुळे गोष्टीही खूप ऐकल्या.  सलील काका ऑडिशनपासून सोबत होता. त्याच्याबरोबर खूप गप्पा मारल्या, जोक केले, मजा आली.

* OTT च्या काळात हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन का बघावा?

सुमीतः सलील-संदीपने लहान मुंलांसाठी इतकं काम केलंय की हा चित्रपट म्हणजे त्याचं सार आहे. या सिनेमात कलाकारांची जबरदस्त फळी आहे. संदीपचे शब्द, सलीलचे संगीत हे सिनेमाचं महत्त्वाचं पात्रच आहे. जोडीला शंकर महादेवन आणि सुनिधी चौहानचा सूर आहे. सामाजिक, ऐतिहासिक सिनेमे बरेच येत आहेत, पण या जॉनरचा सिनेमा बऱ्याच काळात आलेला नाही. हा सिनेमा छप्पन भोग थाळीच म्हणता येईल.

Web Title: ekda kay zala marathi movie sumeet raghavan urmila kothare pushkar shrotri saleel kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.