‘गोलमाल’ नको; हवी मेहनतीची तयारी
By Admin | Updated: July 25, 2015 02:54 IST2015-07-25T02:54:53+5:302015-07-25T02:54:53+5:30
‘इक्बाल’मधील तडफदार ‘बॉलर ते गोलमाल’मधील विनोदी अभिनयाने श्रेयस तळपदे याने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. मराठीतून हिंदीत

‘गोलमाल’ नको; हवी मेहनतीची तयारी
‘इक्बाल’मधील तडफदार ‘बॉलर ते गोलमाल’मधील विनोदी अभिनयाने श्रेयस तळपदे याने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. मराठीतून हिंदीत जाणारे अभिनेते फारसे यशस्वी होत नाहीत, हा समज त्याने खोटा ठरविला. ‘आभाळमाया’मधील निशांत, ‘दामिनी’मधील तेजस, ‘अवंतिका’मधील अभिषेक जहागिरदार, कॉलेजवयीन मुलांना वेड लावणारी बेधुंद मनाची लहर, अशा अनेक मालिकांमधून सगळ्यांना वेड लावणारा आणि ‘सावरखेड एक गाव’नंतर इक्बाल, अपना सपना मनी मनी, दोर, ओम शांती ओम, बॉम्बे टू बँकॉकचा प्रवास करीत कधी गंभीर, तर कधी कॉमेडीचा प्रवास करणाऱ्या श्रेयसने खास ‘सीएनएक्स’च्या वाचकांशी ‘सेलीब्रिटी रिपोर्टर’ म्हणून हितगुज करत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी ही अत्यंत प्रोफेशनल आहे. येथे ‘गोलमाल’ चालत नाही, तर प्रचंड मेहनत
करावी लागते. मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत जाणे बहुतेकांचे स्वप्न असते; पण त्यासाठी त्या कलाकाराने कोणत्याही भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याबरोबरच एखादा रोल किंवा समोर कोणीही दिग्गज कलाकार असले, तरी आत्मविश्वासाने त्या वेळी कॅमेऱ्याला सामोरे गेले पाहिजे, असे
श्रेयस सांगतो.
‘मराठी ते बॉलीवूड’च्या प्रवासाबद्दल माझी वाटचाल अवघड होती; पण अशक्य नव्हती. मी पूर्वी जेव्हा नाटकांमध्ये काम केले होते, तेव्हाच माझ्या गुरूंनी आमच्या अभिनयावर प्रचंड मेहनत घेतली होती. अभिनयाचे परिपूर्ण संस्कार त्या वेळीच झाल्याने, आम्ही तिथेच पूर्णपणे या क्षेत्रात एंट्री करण्यासाठी तयार झालो होतो. त्यामुळे मराठीतून हिंदीमध्ये जाताना अवघड गेले नाही.
‘बॉलीवूड’कडून
खूप काही शिकण्यासारखे
मराठीला चांगले दिवस
येत आहेत, ही माझ्यासाठी खरोखरीच अभिमानाची गोष्ट आहे. पण बॉलीवूडमध्ये खूप शिकण्यासारखे आहे. हिंदीचा व्याप प्रचंड आहे आणि ते साकारण्याची किंवा त्याचे प्रदर्शन करण्याची पद्धतही व्यापक आहे. त्यामुळे सिनेमा कसा मोठा करावा, त्याची जाहिरातबाजी आणि मार्केटिंग कसे करायचे, या गोष्टी बॉलीवूडमध्ये चांगल्याप्रकारे शिकायला मिळतात.
एक्सायटिंग प्रोफेशन
एकेकाळचा चॉकलेट हीरो आणि बाजीमध्ये साकारलेला अॅक्शन हीरो या दोन टोकाच्या भूमिका आहेत; पण मला वेगवेगळ्या भूमिकांबरोबरच कधी निर्माता, तर कधी अभिनेता साकारायला मनापासून आवडते. कामात तोचतोचपणा आणून कंटाळण्यापेक्षा सतत नवीन पद्धतीचे काम मला फ्रेश ठेवते. त्यामुळे मला हे माझं प्रोफेशनच खूप एक्सायटिंग वाटतं. कारण इथे मी कधी गुंड असतो, तर कधी गावातील पत्र वाचून दाखवणारा असतो. याला मला अभिनेत्याच्या आयुष्यातील उत्क्रांतीच म्हणावीशी वाटते.
चॉकलेट बॉय आणि अॅक्शन हीरोनंतर आता मला एखादी निगेटिव्ह आणि ऐतिहासिक भूमिका साकारायची इच्छा आहे. ऐतिहासिकमध्ये एखाद्याच्या चरित्रावर आधारित असलेली भूमिका करायला मला नक्कीच आवडेल. ‘दोर’मधला बहुरूप्याचा रोल मला विशेष आवडतो. विविध वेषांत अचानक येऊन झिनत म्हणजे, चित्रपटातील गुल पनागसमोर प्रकट होऊन तिला मदत करणारा हा बहुरूपी आहे.