दिशा पटानीच्या वडिलांना मिळालं रिव्हॉल्व्हर लायसन्स, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही भीती कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:10 IST2025-11-16T16:48:40+5:302025-11-16T17:10:49+5:30
दिशा पटानी हिच्या वडिलांना बरेली जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून शस्त्र परवाना मिळाला आहे.

दिशा पटानीच्या वडिलांना मिळालं रिव्हॉल्व्हर लायसन्स, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही भीती कायम!
Disha Patani's Father Gets Arms License: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेलीतील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेनंतर दिशाचे वडील आणि निवृत्त डीएसपी जगदीश पटानी यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला होता. यानंतर आता त्यांना बरेली जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून शस्त्र परवाना मिळाला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जिल्हा दंडाधिकारी अवनीश सिंह यांनी सांगितले की, गोळीबाराच्या घटनेनंतर जगदीश पटानी यांनी पिस्तूल परवाना मागितला होता आणि सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना तो देण्यात आला आहे.
बरेली येथील दिशा पटानीच्या घरावर सुमारे दोन महिन्यांपूर्वी गुन्हेगारांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि माध्यमांमध्येही मोठी चर्चा झाली. उत्तर प्रदेश सरकारने याची दखल घेत तात्काळ कारवाई केली. आठवडाभराच्या आत झालेल्या एका चकमकीत या प्रकरणाशी संबंधित दोघे गुन्हेगारांना ठार करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणानंतर जिल्हा प्रशासनाने दिशा पटानी यांचे वडील जगदीश पटानी यांना शस्त्र परवाना जारी केला आहे. मात्र, सैन्यात मेजर पदावर काम केलेल्या खुशबू पटानी यांचा परवाना अद्याप मंजूर झालेला नाही.
दिशा पटानीच्या घरावर हल्ला का?
१२ सप्टेंबरला पहाटे ३:४५ वाजता दिशा पटानीच्या बरेली येथील घरी दुचाकीवरून आलेल्या दोन गुन्हेगारांनी सुमारे नऊ राउंड गोळीबार केला. हल्ल्यानंतर, टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दावा केला होती की अभिनेत्रीची बहीण खुशबू पटानीने प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आला आहे.
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास, दिशा पटानी लवकरच 'वेलकम टू द जंगल' या मल्टी-स्टारर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल यांच्यासह अनेक मोठे सेलिब्रिटी आहेत. या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा होणे बाकी आहे.