हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:08 IST2025-09-17T18:07:56+5:302025-09-17T18:08:33+5:30

टॉम हँक्सचा सिनेमा होता, कोल्हापूरला जाताना सीन्स फॅक्सने मिळाले अन्...

dilip prabhavalkar gave audition for hollywood movie the terminal but couldnt got the role | हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

दिग्गज अभिनेता दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) वयाच्या ८१ व्या वर्षीही कमाल करत आहेत. त्यांचा 'दशावतार' सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात त्यांनी साकारलेली बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारली आहे. सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिलीप प्रभावळकरांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका केल्या. चिमणराव, गंगाधर टिपरे, महात्मा गांधी अशा त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. विशेष म्हणजे दिलीप प्रभावळकरांना हॉलिवूडमध्येही काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र त्यांची निवड झाली नाही. याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे. 

'लेट्स अप'मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर म्हणाले, "लवलीन टंडन नावाच्या दिल्लीच्या कास्टिंग डायरेक्टरचा मला फोन आला होता. मी तेव्हा कोल्हापूरला निघालो होतो. तिने फोनवर स्वत:ची ओळख सांगितली. ती मला म्हणाली की तुम्हाला हॉलिवूडच्या एका सिनेमात काम करण्यात रस आहे का? मला वाटलं कोणीतरी माझ्यासोबत गंमत करत आहे. पण म्हणून मी तिचा अपमान केला नाही खरं निघालं तर? मी नीट चौकशी केली. कोण दिग्दर्शक आहे? असं विचारलं. तर ती म्हणाली, 'स्पिलबर्ग'. मला धक्काच बसला. नंतर ती मला सिनेमाविषयी सांगायला लागली. तेव्हा मला पटलं की हा खराच कास्टिंग कॉल आहे. तिने मला तुम्ही कुठे आहात? विचारलं. मी म्हणालो, 'कोल्हापूरला चाललोय'. त्यावेळी फॅक्स होतं. तिने मला फॅक्सने सीन्स पाठवले आणि सिनेमात माझ्याबरोबर टॉम हँक्स असल्याचंही सांगितलं. तुम्ही कधी येणार आहात? असंही तिने मला विचारलं. मी विचारलं अर्जंट आहे का? ती म्हणाली हो. मुंबईत माहिमला बॉम्बे स्कॉटिशसमोर फ्लॅट आहे तिथे स्क्रीन टेस्ट होईल असं ती म्हणाली. मला सीन्स फॅक्सने मिळाले. मी घाईघाईत ते वाचले, पाठ केले. तेव्हाच माझी टिपरे मालिका सुरु होती. मग मी केदार शिंदेच्या भावाकडून विग मागवून घेतला. विदाऊट विग, विथ विग, विदाऊट चष्मा, विद चष्मा असे वेगवेगळ्या तऱ्हेने ते इंग्रजी संवाद बोललो.ऑडिशनवेळी तिथे मराठी कॅमेरामन होता. तो मला म्हणाला की सर तुमची निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण मॅडमला तुमची ऑडिशन आवडलेली दिसतेय. ३-४ महिने सेवन स्टार हॉटेलमध्ये राहू शकाल ना? असंही लवलीनने मला विचारलं होतं."

ते पुढे म्हणाले, "एअरपोर्टवर टॉम हँक्सला मदत करणाऱ्या भारतीय व्यक्तीचा हा रोल होता. स्क्रीन टेस्ट नंतर बरेच दिवस मी आतुरतेने वाट पाहत होतो. स्टीव्हन स्पिलबर्गचे काही सिनेमेही बघायला घेतले. पण मला कॉल काही आलाच नाही. मग मी रागाने तो सिनेमा बघितलाच नाही. नंतर मला कळलं की त्यांनी सारख्याच ८६ व्या वर्षाच्या माणसाला सिनेमाला घेतलं होतं. माझी ही संधी हुकली म्हणून मी नंतर 'हॉलिवूडची हूल' असा लेखही लिहिला होता."

Web Title: dilip prabhavalkar gave audition for hollywood movie the terminal but couldnt got the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.