अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:20 IST2025-11-20T10:16:54+5:302025-11-20T10:20:07+5:30
Dharmendra Health Update: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वयोमानानुसार येणाऱ्या समस्यांमुळे त्यांना दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वयोमानानुसार येणाऱ्या समस्यांमुळे त्यांना दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. देओल कुटुंब धर्मेंद्र यांची खूप काळजी घेत आहे. चाहतेही ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या हेल्थ अपडेट समोर आली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
एका सूत्राने एनडीटीव्हीला सांगितले की, "धर्मेंद्र यांना आता पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. ते ठीक आहेत, आधीपेक्षा चांगले आहेत." धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून रजा मिळाली. ते रुग्णालयात असताना त्यांच्या निधनाच्या खोट्या अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे अभिनेत्याची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी ११ नोव्हेंबर रोजी निवेदन जारी करून ते जिवंत असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची पुष्टी केली होती.
देओल कुटुंबाने दिलेलं निवेदन
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देओल कुटुंबाने एक अधिकृत निवेदन जारी केले होते, ज्यात खासगीपणाचे आवाहन करण्यात आले होते आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले होते. निवेदनात लिहिले होते की, "धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी विश्रांती घेत आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत राहील. आम्ही मीडिया आणि जनतेला नम्रपणे विनंती करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा टाळाव्यात आणि या काळात त्यांचा व कुटुंबाच्या खासगी जीवनाचा आदर करावा. आम्ही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मिळालेले सर्वांचे प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छा यांचे कौतुक करतो. कृपया त्यांचा आदर करा कारण ते तुमच्यावर प्रेम करतात."
धर्मेंद्र डिसेंबरमध्ये करणार ९०वा वाढदिवस साजरा
दरम्यान, हेमा मालिनी आणि कुटुंब डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र यांचा ९०वा वाढदिवस साजरा करण्याची योजना आखत आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने नुकतेच सांगितले की, "जर देवाची कृपा राहिली, तर आम्ही पुढील महिन्यात दोन वाढदिवस साजरे करू, धर्मजींचा आणि ईशाचा." वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, धर्मेंद्र लवकरच 'इक्कीस' या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.