कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
By ऋचा वझे | Updated: September 11, 2025 13:29 IST2025-09-11T13:27:49+5:302025-09-11T13:29:53+5:30
'दशावतार' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलाकारांनी सांगितले सिनेमाच्या शूटचे किस्से; नक्की वाचा

कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत 'दशावतार' १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डेसह अनेक कलाकार आहेत. गुरु ठाकूर यांनी संवाद लेखन केलं आहे. कोकणातील दशावतार या पारंपरिक कलेवर ही एक गूढ कथा आधारित आहे. दिलीप प्रभावळकरांचा लूक पाहून सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यानिमित्ताने 'दशावतार' टीमशी 'लोकमत फिल्मी'ने साधलेला संवाद
'दशावतार' सिनेमाचं नेमकं वैशिष्ट्य काय?
दिग्दर्शक - आपल्या मातीशी निगडित गोष्टी सांगणं हा माझा यामागचा हेतू होता. माझं आणि कोकणाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. लहानपणापासून कोकणात माझ्यावर जे संस्कार झाले ते गोष्टीच्या रुपातून आले आणि त्यावर आता हा दशावतार चित्रपट साकारला आहे. सिनेमात जे कोकण दिसतंय त्याचं संपूर्ण शूट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गर्द जंगलात झालं आहे. बहुतांश प्रसंग आम्ही रात्री जंगलातील किर्र अंधारात शूट केले आहेत. विशाल नद्या, हजारो वर्ष जुनी मंदिरं, टुमदार गावं असं कोकण मी या सिनेमातून दाखवलं आहे. जंगलात जाणं, तिथला सेटअप करणं सगळंच आव्हानात्मक होतं पण सर्वांच्या साथीने ते शक्य झालं.
सिनेमासाठी संवाद लिहिताना काय जाणवलं?
गुरु ठाकूर - पटकथा, संवाद लिहिताना एखाद्या माणसाची खुबी, वैशिष्ट्य, संवादातला मिश्किलपणा माहित असला की ते लिहायला सोपं जातं. संवाद लिहिताना ही भूमिका कोण करणार हे तेव्हाच डोळ्यासमोर येतं. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची खुबी माहितच होती. त्यामुळे या भूमिकांना तेच न्याय देतील असा विचार आला आणि त्यांची निवड केली.
सिनेमातील तुझी भूमिका आणि एकंदर अनुभवाबद्दल सांगशील
सिद्धार्थ मेनन - माझी माधव मेस्त्री ही भूमिका आहे. दिलीप प्रभावळकर माझे बाबानू आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्यच आहे. हा सिनेमा म्हणजे दिलीप सरांच्या कामगिरीला ट्रिब्यूटच आहे असं मला वाटतं. त्याचा भाग मला होता आला याचा मला आनंद आहे.
सिनेमात काम करताना तुझा अनुभव कसा होता
प्रियदर्शिनी - मी वंदना सोमण हे पात्र साकारलं आहे. या भूमिकेबद्दल मी जी कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळंच सेटवर घडत होतं. माझ्याकडून नेमकं कसं काम होतंय याचा मला अंदाज येत नव्हता. पण सुबोधने ती कोकणातली वंदना माझ्याकडून घडवून घेतली. मी कोकणातली वाटावी ही माझ्यावर जबाबदारी होती. भाषेचा आधार नसताना हे करणं आव्हानात्मक होतं. सिनेमाचं शूट जंगलात करणं हेही खूप विशेष होतं. तीनशे लोकांचा क्रू, गर्द जंगल हे पाहून आपण ही कोणती भव्यता बघतोय याचा आम्हालाच विश्वास बसत नव्हता.
तुझ्यासाठी हा सिनेमा किती खास आहे
अभिनय बेर्डे - खूपच खास आहे. कारण मी यामध्ये कधीही न साकारलेली अशी भूमिका केली आहे. वरवरचं नाही तर खोलात जाऊन चांगली गोष्ट लोकांपर्यंत आणायची याचा आम्ही सर्वांनीच प्रयत्न केल. तसंच दिग्गज कलाकारांसोबत मला काम करायला मिळालं. दिलीप काकांकडून खूप शिकायला मिळालं याचा मला आनंद आहे. तसंच शूटच्या वेळी आम्ही जंगलात अनेक आव्हानात्मक गोष्टी केल्या. पण सगळं इतकं छान सेटअप केलं होतं ज्यामुळे आम्हाला काम करणं खूप सोपं झालं.
सिनेमा का पाहावा?
दिग्दर्शक - दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय, इतर कलाकारांच्या भूमिका, कोकणातील सौंदर्य आणि गूढ कथा या सर्वच गोष्टी खिळवून ठेवणाऱ्या आहेत. यासाठी सिनेमा नक्की पाहा.