"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:01 IST2025-07-03T16:59:50+5:302025-07-03T17:01:14+5:30

Nilesh Sable And Sharad Upadhye : राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता निलेशने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांना प्रत्युत्तर दिले.

"channel took him out...", Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable broke his silence on Sharad Upadhyay's allegations, said... | "डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) लवकरच पुन्हा एकदा भेटीला येत आहे आणि या शोसाठी ऑडिशन्सला सुरूवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये निलेश साबळे(Nilesh Sable)च्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) दिसणार असल्याचे वृत्त आले. हे वृत्त वाचल्यानंतर निलेशच्या चाहत्यांना धक्का बसला. त्याने हा शो का सोडला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यादरम्यान राशीचक्रकार शरद उपाध्ये (Sharad Upadhye) यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेनेचला हवा येऊ द्याच्या सेटवर कशी वागणूक दिली होती, याबद्दल सांगितले होते. त्यात त्यांनी निलेश साबळेवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता निलेशने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांना प्रत्युत्तर दिले.

निलेश साबळेने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर मौन सोडले आहे. त्याने या व्हिडीओत म्हटलं की, नमस्कार. मी डॉ. निलेश साबळे, राशीचक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी थेट संवाद साधता आला असता. खरंतर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही फोन नंबर त्यांच्याकडे आहे. पण, त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करूनच व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो, तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ आली आहे. मला नेहमी वाटायचं या माध्यमावर फक्त मनोरंजनाचे व्हिडीओ पोस्ट करत जाऊयात. जेणेकरून आपलं जे काम आहे लोकांना हसवणं आणि तेवढंच आपण करू. पण कधी असा व्हिडीओ करावा लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण वेळ असते त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी कराव्या लागतात. 

''सगळेजण गुरू म्हणून फॉलो करतात''

त्याने पुढे म्हटले की, सन्माननीय शरद उपाध्ये सर, तुमची आणि माझी १-२ वेळा भेट झाली होती. कशी झाली होती, तेही मी प्रेक्षकांना सांगणार आहे. तुम्ही माझ्यासाठी कायम गुरुतुल्य आहात, होतात आणि पुढेही राहाल. परंतु काल तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलं होतं की, निलेश साबळेला झी मराठीने डच्चू दिला. उगाच माहित नसताना बोलणं, लिहिणं माझ्यासारख्या माणसाला जबाबदारीचं वाटत नाही. जर आपण आपली बाजू मांडली नाही, तर लोकांना कसं कळणार.  झी मराठीने डच्चू दिला, हकालपट्टी केली. सर, तुम्हाला याची माहिती आहे का? तुमच्यासारख्या मोठ्या गुरूतुल्य व्यक्तीने ही पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती. सोशल मीडियाचा इतका वापर होतो. सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे. कारण, सर तुम्हाला सगळेजण गुरू म्हणून फॉलो करतात. मला फॅन म्हणून फॉलो करतात. खरंतर झी मराठीमध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहे तुम्ही एक फोन करून माहिती घ्यायला हवी होती. नेमकं काय झालंय? निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीये? हे तुम्ही विचारायलं हवं आहे.  


निलेशने शोमध्ये न दिसण्यामागचं सांगितलं कारण
निलेश साबळेने सांगितले, झी मराठीच्या अधिकृत पदावर जी व्यक्ती हेड म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी मला अनेकवेळा फोन केले. मी नावंही घेऊ शकतो. झी मराठचे नॉन फिक्शन हेड रोहन राणे यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले. चला हवा येऊ द्या सुरू करतोय. डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही. आपण एकदा मिटींग करूयात. त्यानंतर महिन्याभरापूर्वी माझी दोन तास झी मराठीबरोबर सविस्तर मिटींग झाली. त्यांच्या वरळीच्या ऑफिसला आमचं सगळं बोलणं झालं होतं. माझ्या काही अडचणी होत्या, मी सध्या एक सिनेमा करतोय त्यात मी सध्या अडकलो आहे. त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे माझ्या तारखा जुळल्या नाहीत. याशिवाय अनेक कारणं आहेत. त्यामुळे सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेतो आहे, अशी विनंती मी त्यांना केली होती. याचा अर्थ असा होत नाही की, मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला. मी स्वत:हून कार्यक्रमातून बाहेर पडलोय. हेच कारण भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे. ते माझ्याच सिनेमात माझ्याबरोबर काम करत आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमात नसतील. दोन लोक या कार्यक्रमात नाहीत.

''ही खरंच माझी जबाबदारी असेल का?''
तो पुढे म्हणाला, तुम्ही पुढे असे लिहिले आहे की, सेटवर माझा अपमान केला. तुमचा एपिसोड २०१४ ते २०१५ मध्ये शूट झालेला आहे, तेव्हा हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमाच्या पहिल्या ५० भागांमधला हा एपिसोड आहे. मला सेटवर बोलावलं, मला पाणीही विचारलं नाही असंही तुम्ही लिहिलंय. मिरारोड परिसरात हे शूटिंग चालतं आणि चॅनेलची खूप मोठी टीम यामागे कार्यरत असते. क्लासिक स्टुडिओ हा सेट आहे. तिथली सगळ्यात मोठी रूम देण्यात आली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक रूममध्ये पाण्याच्या बाटल्या आधीच ठेवलेल्या असतात. कारण, कोणत्या रूममध्ये काय काय असलं पाहिजे याची आदल्या दिवशी मिटींग झालेली असते आणि या गोष्टी असल्याच पाहिजे अशी वार्निंग देण्यात आलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी विचारलं नाही, ही खरंच माझी जबाबदारी असेल का? हा प्रश्न मला अजूनही पडलेला आहे. या शोचा निर्माताच मी नाही आहे. तरीही पाणी न देणं हा अपमान मी कसा केला. स्टेजवर जाताना स्माइलही दिलं नाही आणि ४ वाजता आपली भेट झाली असे तुम्ही म्हणालात. याचा अर्थ आपल्यात संवाद झाला.  माझ्यापेक्षा जे कलाकार मोठे असतात त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून मी त्यांना मेकअप रुममध्ये भेटायला जातो. अनेक मोठमोठी मंडळी आली, त्यांच्या सगळ्यांच्या रूममध्ये मी पाया पडूनच आत गेलोय. तसेच तुमच्याही बाबतीत मी केले आहे. याला साक्षीदार वैयजंती आपटे मॅडम आहेत. तुम्ही मला आशीर्वाद दिले, माझे कौतुकही केले. आधी ठरतं काय काय करणार. त्यावेळी आपल्यात संवाद झाला आहे. तर परत स्टेजवर मी जाताना कोणती स्माइल देणं अपेक्षित होतं? आदल्या दिवशी आपलं फोनवर बोलणं देखील झाले. रामदास पाध्ये सर आणि अशोक हांडे सर त्यांच्या एपिसोडमध्ये आले होते. त्यांच्याशी माझं आधी काहीच बोलणं झालं नव्हतं म्हणून मी ते काय-काय सादरीकरण करणार याची माहिती घेत होतो.

''मी सुद्धा हाच मार्ग निवडला''
कार्यक्रमात रोल २ तास ते अडीच तास होतो. प्रत्येक कलाकाराला आपला मुद्दा आणि कला सादर करण्यासाठी भरपूर वेळ दिला जातो. इतर लोकांना बोलायला दिलं आणि मला बोलू दिलं नाही असं तुम्ही म्हटलं. तुमच्याबरोबर अशोक हांडे सर आणि रामदास पाध्ये सर होते. मी कोणाला जास्त बोला, कमी बोला असं सांगू शकत नाही. या दोन्ही व्यक्ती तुमच्या इतकेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता यामुळे तुमचा काय अपमान झाला मला खरंच समजत नाही. तुम्ही १० वर्षांनंतर हा मुद्दा कसा सांगू शकता, हा प्रश्न मला पडला आहे. यानंतर आपली भेट ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या मुलाच्या लग्नात झाली होती. तेव्हा आपण एका टेबलावर बसून २ ते अडीच तास गप्पा मारत होतो. चला हवा येऊ देविषयी गप्पा मारल्या, माझं कौतुक केलं. तुम्ही माझ्या भविष्याविषयी बोललात. आपण फोटोही काढले. ही भेट २०१७ मध्ये झाली होती तेव्हा अडीच तास गप्पा मारत होतो तेव्हाच तुम्ही २०१४ मध्ये सेटवर घडलेली घटना का सांगितली नाही? आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगायच्या होत्या म्हणून मी सुद्धा सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.


''हे एकदा झालं असतं तर मी सोडून दिलं असतं. पण...''
तो पुढे म्हणाला, कॉलेजला असल्यापासून मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. राशीचक्रचे सर्व व्हिडीओ मी पाहिले आहेत. आजही तुमच्याबद्दल तोच आदर आहे. मला तुमचं काम फार आवडतं. पण, तुम्ही असं कराल मला खरंच वाटलं नव्हतं. हे एकदा झालं असतं तर मी सोडून दिलं असतं. हे एकदा नाही ही तिसरी वेळ आहे. सहा वर्षांपूर्वी देखील तुम्ही अशीच एक पोस्ट शेअर केली होती. जी सापडेल तुम्हाला सोशल मीडियावर. हे सगळे इतर कलाकार इतके छान आहेत. पण ते भंगारवाल्याच्या हाती लागले, भंगारवाल्याच्या हाती हिरे आले तर काय होईल असे तुम्ही लिहिले होते. त्यावेळी मी रिएक्ट नाही झालो. म्हणून आज सोशल मीडियावर येऊन मला माझी बाजू स्पष्ट करावी लागली. सर, मला तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही भंगारवाला म्हणालात. भंगारवाला, अहंकारी, हीन दर्जाचा, सर्वनाश, अध:पतन, गलिच्छ, खालच्या दर्जाचा हे सगळे शब्द तुमचे आहेत. जे तुम्ही ६ वर्षांपूर्वीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तुम्ही इतकं आम्हाला काय काय बोलायचं आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं. चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वात अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करतोय हे मला माहित आहे. अभिजीत माझा खूप चांगला मित्र आहे. आमची खूप उत्तम मैत्री आहे, ती कायम राहील. अभिजीत माझ्याहीपेक्षा चांगले सूत्रसंचालन करतो. त्याला माझ्या सल्ल्याची गरज नाही. त्याला आणि टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा. हा कार्यक्रम माझ्या कायम हृदयात राहील.

''माझेही ६ तास वाया गेले...''
मी तुमच्याविषयी कधीही वाईट पोस्ट केली नाही आहे. ना तुमच्या मी शेजारी राहतो, ना तुम्हाला मी कसाला त्रास देतोय. माझं माझं छोटंस काम करतोय माझ्या आयुष्यात. मग हे १० वर्षांनंतर हे पुन्हा-पुन्हा का? हे असं का? या घटनेला १० वर्षे झालीत तरी सुद्धा हे का होतंय? तुमच्या आणि माझ्या वयाची तुलना होऊ शकत नाही. व्यवसायही वेगळा आहे. तरीसुद्धा हे का, असा प्रश्न मला पडला आहे. तसेच तुम्ही असं लिहिलं आहे की, माझे सेटवर ५ ते ६ तास वाया गेले, सर तुम्हाला सांगतो मला तुमच्या पोस्टनंतर काल कमीतकमी १००-१५० लोकांचे फोन आले आणि त्यांची मी समजूत काढत होतो. ती मोठी व्यक्ती आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. माझेही प्रत्येकाशी बोलण्यात ६ तास वाया गेले. तुम्ही माझे सहा तास एका फोनने वाचवू शकला असतात.एवढंच माझं म्हणणं आहे, असे निलेश या व्हिडीओत म्हणाला.

Web Title: "channel took him out...", Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable broke his silence on Sharad Upadhyay's allegations, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.