'३ इडियट्स'चा सीक्वल येणार?, रुमर्सवर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला - "रॅंचो ही माझी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:09 IST2025-12-31T13:08:25+5:302025-12-31T13:09:54+5:30
3 Idiots Movie Sequel : २००९चा ब्लॉकबस्टर चित्रपट '३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. राजकुमार हिराणी यावर काम करत असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.

'३ इडियट्स'चा सीक्वल येणार?, रुमर्सवर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला - "रॅंचो ही माझी..."
२००९चा ब्लॉकबस्टर चित्रपट '३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. राजकुमार हिराणी यावर काम करत असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे, तर आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी ही मूळ जोडी पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता आमिर आणि आर माधवन यांनी या चर्चांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड हंगामासाठी सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत माधवन म्हणाला, "'३ इडियट्स'चा सीक्वल बनवणे ऐकायला चांगले वाटते, पण ते थोडे विचित्रही आहे. आम्ही तिघे मी, आमिर आणि शर्मन आता वयाने मोठे झालो आहोत. सीक्वलमध्ये आमची कथा पुढे कशी जाईल? आमचे आयुष्य आता कसे असेल? ही कल्पना मनोरंजक असली तरी, एका चांगल्या सीक्वलसाठी ती कदाचित योग्य ठरणार नाही. मला राजू हिराणींसोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल, पण '३ इडियट्स' पुन्हा? मला वाटते ती मोठी चूक ठरेल."
काय म्हणाला आमिर खान?
दुसरीकडे, आमिर खानने सीक्वल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण अद्याप कोणाशीही बोलणे झाले नसल्याचे स्पष्ट केले. आमिर म्हणाला, "तो चित्रपट बनवताना आम्हाला खूप मजा आली होती. 'रॅंचो' ही माझी आतापर्यंतची सर्वात लाडकी व्यक्तिरेखा आहे. आजही लोक रॅंचोबद्दल बोलतात. त्यामुळे हो, मला सीक्वल करायला आवडेल, पण अजून कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही."
'३ इडियट्स'बद्दल काही खास गोष्टी
'३ इडियट्स' हा जगभरात ४०० कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने परदेशातील बॉक्स ऑफिस कामगिरीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले होते. प्रदीर्घ काळ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. टीव्हीवर वारंवार होणारे प्रसारण आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शरमन यांच्यासोबत बोमण इराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंगने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.