Riteish Deshmukh : “राजकारण कायम माझं...”; रितेश देशमुख राजकारणात येणार का? वाचा, अभिनेत्याचं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:51 AM2023-04-14T10:51:19+5:302023-04-14T10:59:28+5:30

Riteish Deshmukh : राजकारणावर भरभरून बोलला रितेश देशमुख, वाचा काय म्हणाला...

Will Riteish Deshmukh enter in politics? Read, the actor's answer | Riteish Deshmukh : “राजकारण कायम माझं...”; रितेश देशमुख राजकारणात येणार का? वाचा, अभिनेत्याचं उत्तर 

Riteish Deshmukh : “राजकारण कायम माझं...”; रितेश देशमुख राजकारणात येणार का? वाचा, अभिनेत्याचं उत्तर 

googlenewsNext

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एका राजकीय घराण्याचा वारसदार आहे.  माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा हा दुसरा मुलगा. संपूर्ण देशमुख घराणं राजकारणात सक्रिय असलं तरी रितेशला लहानपणापासून अभिनेताच व्हायचं होतं. २००३ मध्ये त्याने 'तुझे मेरी कसम'मधून सिनेकरिअरला सुरुवात केली. या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याच सिनेमाच्या सेटवर रितेशची जिनिलिया डिसूजाशी ओळख झाली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघंही विवाहबंधनात अडकले. जिनिलिया हेच रितेशचं पहिलं प्रेम असं तुम्हाला वाटत असेल तर ते खरं नाही. कारण रितेशचं पहिल प्रेम दुसरंच आहे. होय, लग्नानंतर कित्येक वर्षांनी रितेशने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रितेशने याचा खुलासा केला.  “राजकारण की सिनेसृष्टी, तुमचं पहिलं प्रेम कोणतं?” असा प्रश्न रितेशला मुलाखतीत विचारला गेला. यावर त्याने हटके उत्तर दिलं.

काय म्हणाला रितेश...?
“मी खरं सांगू का तर माझं पहिलं प्रेम राजकारण आहे. अर्थात मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. पण निश्चितपणे ते माझं पहिलं प्रेम आहे. कारण मी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात वाढलो आहे. आजूबाजूला काय घडतंय, याचं भान असतंच आणि त्यामुळे ते राजकारण कायम माझं पहिलं प्रेम आहे आणि असणार आहे. ते प्रेम पुर्ण व्हावं अशी इच्छा नव्हती. पण राजकारणाबद्दल प्रेम आणि आपुलकी हे कायमच असेल,” असं रितेश यावेळी म्हणाला.

राजकारणात जाणार का?
‘तुमचे दोन्ही बंधू अमित देशमुख, धीरज देशमुख राजकारणात सक्रीय आहेत. मग तुम्हाला तशी इच्छा आहे का?’ असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावर रितेशने नकारार्थी उत्तर दिलं. तो म्हणाला,“अजिबात नाही. घराणेशाहीचा वाद आता यापुढे नको. माझं राजकारणाबद्दल जे काही स्वप्न आहे, ते मी चित्रपटात पात्राद्वारे पूर्ण करेल. तसंही ते फार सोप्प आहे. भविष्यात काय होईल, याची मला कल्पना नाही. मला अभिनेता व्हायचं होतं. मला ती संधी मिळाली आणि मी अभिनेता झालो. गेली २० वर्ष मी अभिनय क्षेत्रात काम करतोय. या काळात लोकांनी भरभरून प्रेम दिलं, म्हणून मी या क्षेत्रात अजून टिकून आहे. माझ्या कामावर माझं नितांत प्रेम आहे आणि मरेपर्यंत अभिनय करावं ही माझी इच्छा आहे.”

Web Title: Will Riteish Deshmukh enter in politics? Read, the actor's answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.