'शहंशाह'च्या शूटवेळी रोहिणी हट्टंगडी बिग बींना असं काय बोलल्या? आजही 'त्या' गोष्टीचा त्यांना होतोय पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:00 IST2025-08-09T17:00:03+5:302025-08-09T17:00:43+5:30
Rohini Hattangadi And Amitabh Bachchan :'शहंशाह' सिनेमात रोहिणी हट्टंगडी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत 'शहंशाह' सिनेमाच्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला.

'शहंशाह'च्या शूटवेळी रोहिणी हट्टंगडी बिग बींना असं काय बोलल्या? आजही 'त्या' गोष्टीचा त्यांना होतोय पश्चाताप
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्यांनी मराठीसह हिंदीतही विविध भूमिका साकारुन आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी हिंदीमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत 'शहंशाह' सिनेमाच्यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला.
'शहंशाह' सिनेमात रोहिणी हट्टंगडी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, ''मी का बोलले याचा मला नंतर खूप पश्चाताप झाला. तर शंहशाहमध्ये पहिला दिवस होता माझा. अमितजी, मी आणि सुप्रिया पाठक होतो. तर आम्ही दुपारचं जेवण करून मी आणि सुप्रिया आम्ही दोघी जणी रुममध्ये होतो. अचानक रुमचा दरवाजा कोणीतरी वाजवला आणि अमितजी आत आले. ते सुप्रियाला म्हणाले, पाहा सुप्रिया माझी कशी अवस्था केली आहे. सुप्रियाने त्यांच्यासोबत आधी दोन-तीन दिवस काम केलं होतं. ती त्यांच्यासोबत थोडीफार कम्फर्टेबल होती. आणि मला असं वाटत होतं काय चाललंय. एकतर लावारीसचं ते गाणं ऐकताना तर म्हटलं काय चाललंय इतका चांगला अभिनेता आणि काय करतोय वगैरे. एक हे होतं की मग मी बोलले... का बोलले मला नंतर पश्चाताप झाला.''
नंतर मला असं झालं हे काय बोलले...
त्या पुढे म्हणाल्या, ''मला माहित नाही माझ्या मनात नेमकं काय आलं, पण मी म्हटलं तुम्ही जे काही 'लावारीस'मध्ये केलं आहे त्याच्यासमोर हे काहीच नाही. नंतर मला असं झालं हे काय बोलले मी. बरं हे ऐकल्यानंतर काही उत्तर नाही ते टर्न मारला आणि निघून गेले ते. सेटवर गेल्यानंतर मला काहीतरी उत्तरं द्यायला लागणार आहेत. काहीतरी टोमणा ऐकावे लागेल आणखीन काहीतरी आणि जेव्हा श्वास घेऊन मग सेटवर जेव्हा गेले तेव्हा तू विश्वास ठेवणार नाही. ते रिलॅक्समध्ये होते म्हणजे मला कुठेही असं जाणवलं नाही की मी असं काहीतरी बोललीये.''