संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर 'छावा' फेम विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "तो आता माझ्यापेक्षाही..."
By देवेंद्र जाधव | Updated: July 17, 2025 11:55 IST2025-07-17T11:53:33+5:302025-07-17T11:55:16+5:30
Vicky Kaushal On Santosh Juvekar Trolling: संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं, त्यावर विकी कौशल आणि छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काय म्हणाले, जाणून घ्या

संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर 'छावा' फेम विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "तो आता माझ्यापेक्षाही..."
'छावा' सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेला हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांची फौज होती. यापैकी संतोष जुवेकरने सिनेमात रायाजीची भूमिका साकारली होती. संतोष जुवेकरने या सिनेमानंतर दिलेल्या एका मुलाखतीत मी औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही, असं वक्तव्य केल्याने त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अखेर या प्रकरणावर विकी कौशलने प्रतिक्रिया दिली.
संतोषच्या ट्रोलिंगवर विकी काय म्हणाला?
Zen एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत संतोष म्हणाला की, "आता मॅडॉकने 'छावा' सिनेमाच्या यशाचं सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. तेव्हा मला लक्ष्मण सर आणि विकी कौशल दोघेही भेटले. ते दोघेही मला भेटून अर्थात हसले. मग मला विकी म्हणाला, तू माझ्यापेक्षाही जास्त लोकप्रिय झाला आहेस. संत्या या गोष्टी सोडून टाक. त्यांचा इतका विचार करु नकोस. तू काय आहे, कसा आहेस, माणूस म्हणून कसा आहेस हे तुझ्या जवळच्या लोकांना माहितीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार कर."
"जे लोक ट्रोलिंग करत आहेत, त्यांना माहित नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतका विचार करु नकोस. हे चालू राहिल. हे लोक बोलत राहणार, तू जर त्यांना उत्तर दिलंस तर ते अजून बोलणार. ते तुझ्या उत्तराचीच वाट बघत आहेत. त्यामुळेच मी कोणालाच उत्तर दिलं नाही."
संतोषच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?
संतोष याच मुलाखतीत म्हणाला की, "जसा आपण विचार करतो, जशी आपली मनस्थिती आणि विचार करण्याची पद्धत वेगळी आहे किंवा मी मानसिकरित्या स्ट्राँग आहे. पण मग जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात जास्तीत जास्त ते म्हणजे आई-वडील. जेव्हा हे सुरु झालं ना तेव्हा आई म्हणाली, अरे काय बोलतायत हे तुझ्याबद्दल, असं कसं बोलतात, त्यांना तू माहित नाही का? तुमच्या घरच्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली तर त्यांना काय त्रास होतो. तुमचा घरचा माहोल आणि परिस्थिती कशी बदलते."
"आज छावा सारखा सिनेमा रिलीज झाला. माझ्या घरचे सगळे आनंदात होते. मी सुद्धा आनंदात होतो. इतकं सगळं चांगलं सुरु असताना जे काय कोणी आनंदावर विरझण टाकलं त्यामुळे त्याचा त्रास होत होता. त्या सिनेमाकडे मी सिनेमा म्हणून बघत नाही. त्या सिनेमात मला काम करायची संधी मिळाली हे माझं भाग्य. पण ट्रोलिंगचा त्रास घरच्यांना होतो. पण जेव्हा त्यांना कळलं की, मी ओके आहे तेव्हा तेही शांत झाले."