"त्याचं शरीर काळनिळं पडलेलं...", हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू, मात्र कुटुंबाला वेगळाच संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:33 IST2025-10-10T15:33:04+5:302025-10-10T15:33:31+5:30
'टायगर ३' चित्रपटात दिसलेला प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि व्यावसायिक बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमानचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र वरिंदरच्या मित्राने त्याच्या निधनानंतर धक्कादायक खुलासा केला असून डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.

"त्याचं शरीर काळनिळं पडलेलं...", हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू, मात्र कुटुंबाला वेगळाच संशय
'टायगर ३' चित्रपटात दिसलेला प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि व्यावसायिक बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमानचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो ४१ वर्षांचा होता. वरिंदर बायसेप्सच्या किरकोळ शस्त्रक्रियेसाठी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात गेला होता. पण, शस्त्रक्रियेदरम्यानच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र वरिंदरच्या मित्राने त्याच्या निधनानंतर धक्कादायक खुलासा केला असून डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.
मृत्यूनंतर वरिंदरचा मृतदेह काळानिळा पडला होता, असं त्याच्या मित्राने सांगितलं आहे. याशिवाय हॉस्पिटल प्रशासनाने निष्काळजी केल्याचंही त्याने म्हटलं आहे. वरिंदरच्या मृत्यूमुळे त्याचे मित्र आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समजत आहे. ऑपरेशन थिएटरमधल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणीही वरिंदरच्या मित्राने केली. पण, ऑपरेशन थिएटरमध्ये सीसीटीव्ही नसल्याने प्रशासनाने त्यांना बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलं.
पंजाबच्या गुरुदासपूर येथील रहिवासी असलेला वरिंदर सिंग घुमानचे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात एक मोठं नाव होतं. त्यानं २००९ मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता आणि मिस्टर एशियामध्ये दुसरे स्थान पटकावलं होतं. तो जगातील पहिला शाकाहारी व्यावसायिक बॉडीबिल्डर म्हणूनही ओळखला जातो.
वरिंदर घुमाननं बॉडीबिल्डिंग क्षेत्रासोबतच पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यानं २०१२ मध्ये 'कबड्डी वन्स अगेन' मध्ये मुख्य भूमिका साकारली. याशिवाय, तो 'रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' (२०१४) आणि 'मरजावां' (२०१९) मध्येही दिसला होता. नुकताच तो सलमान खानच्या 'टायगर ३' मध्ये दिसला होता.