तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:34 IST2025-10-02T09:32:54+5:302025-10-02T09:34:46+5:30
Chandni Bar Sequel : 'चांदनी बार २' चित्रपटाची सध्या बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी तृप्ती डिमरी, अनन्या पांडे आणि शर्वरी वाघ यांच्या नावांची चर्चा आहे.

तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
चित्रपट निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांचा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'चांदनी बार' (Chandni Bar) या क्लासिक चित्रपटाने नुकतीच आपली २४ वी अॅनिव्हर्सरी साजरी केली. याच निमित्ताने, त्याच्या सीक्वलची म्हणजेच पुढील भागाची घोषणा करण्यात आली आहे. समाजातील कटू सत्य आणि मुंबईतील डान्स बारचे आयुष्य कोणताही मुलामा न लावता दाखवणाऱ्या या चित्रपटाने तब्बू(Tabu)ला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा आयाम दिला होता.
आता 'चांदनी बार री-ओपन्स' हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. ज्याचे संदीप सिंग हे निर्माते आणि अजय बहल हे दिग्दर्शक असतील, तो त्याच संवेदनशीलतेने शहराचे दाहक वास्तव पुन्हा एकदा समोर आणणार आहेत. सध्या सर्वात जास्त चर्चा चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी होत आहे. तब्बूने ज्या आयकॉनिक मुमताज या व्यक्तिरेखेला साकारले होते, ती भूमिका आता कोण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. सध्या तीन तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्री या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. यात शर्वरी वाघ, अनन्या पांडे आणि तृप्ती डिमरी या नावाचा समावेश आहे.
मुख्य भूमिकेसाठी बी-टाउनमध्ये रंगली चर्चा
या भावनाविवश भूमिकेसाठीयोग्य चेहरा कोण असेल, यावर इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ही भूमिका साकारण्याची क्षमता असलेली शर्वरी वाघ हिला ती मिळेल का? की निर्माते एका फ्रेश आणि मॉडर्न दृष्टिकोनासह अनन्या पांडे हिची निवड करतील? दुसरीकडे, अलीकडेच आपल्या लोकप्रियतेमुळे आणि दमदार अभिनयामुळे ओळख निर्माण केलेली तृप्ती डिमरी ही देखील एक मजबूत दावेदार मानली जात आहे. या चित्रपटाच्या यशाची गुरुकिल्ली ही कास्टिंगच ठरू शकते, कारण निवडलेल्या अभिनेत्रींना केवळ मूळ चित्रपटाचा वारसा जपायचा नाही, तर आजच्या पिढीसाठी ही कथा नव्या पद्धतीने सादर करायची आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होणार असून, वर्षाच्या अखेरीस तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, 'चांदनी बार'मध्ये मुख्य अभिनेत्री कोण असेल, याकडे चाहते आणि इंडस्ट्रीच्या नजरा लागून राहिल्या आहेत.