टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीनं विशालचं आयुष्यचं बदललं, अभिनेत्याने कमाईचा केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:39 IST2025-09-05T15:35:34+5:302025-09-05T15:39:32+5:30
टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीमधून मिळालेल्या कमाईबद्दल अभिनेत्यानं सांगितलं.

टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीनं विशालचं आयुष्यचं बदललं, अभिनेत्याने कमाईचा केला खुलासा
विशाल मल्होत्रा (Vishal Malhotra) हिंदी सिनेसृष्टीतला लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेता शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क' सिनेमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याला मोठी लोकप्रियताही मिळाली होती. पण, यानंतर त्याला 'टाईपकास्ट' केले गेले. त्याला सतत सहाय्यक अभिनेत्याच्याच भूमिका मिळू लागल्या. यामुळे त्याने मुख्य अभिनेत्याच्या मित्राची भूमिका करण्यास नकार दिला. इथेच त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. नुकतंच त्याने एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील चढ उतारावर भाष्य केलं. तसेच एका टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीमुळे कसं आयुष्यचं बदललं, हेही त्यानं सांगितलं.
स्वतः विशालने एका मुलाखतीत हा अनुभव सांगितला आहे. टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीमुळे त्याला इतके पैसे मिळाले की, त्याने मुंबईतील वांद्रे भागात स्वतःचे घर खरेदी केले. 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला, "जेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मागितल्या, तेव्हा निर्माते आणि दिग्दर्शकांना माझी ही इच्छा आवडली नाही. त्याचे परिणाम खूप वाईट झाले. जेव्हा एक शक्तिशाली व्यक्ती तुम्हाला नकार देतो, तेव्हा तुमचं करिअर संपतं. त्यानंतर दोन वर्षे मला कोणतेही काम मिळाले नाही".
काम न मिळाल्यामुळे प्रचंड निराश झालेल्या विशालला एका टॉयलेट क्लीनर जाहिरातीची ऑफर आली. तेव्हा सुरुवातीला तो देखील संभ्रमात होता की, टॉयलेट क्लीनरची जाहिरात केल्याने त्याच्या प्रतिमेवर परिणाम होईल का. पण त्याने ती जाहिरात स्वीकारली. विशाल म्हणाला , "टॉयलेट क्लीनरच्या जाहिराती आधी लोक मला 'माम्बो', 'वेताल' किंवा 'जॉन' या नावाने ओळखत होते. पण, टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीनंतर लोक मला माझ्या खऱ्या नावाने म्हणजेच विशाल म्हणून ओळखू लागले. मला केवळ माझ्या नावासाठी ओळख मिळावी, यासाठी मी ती जाहिरात केली. आज तर शाहरुख खान सुद्धा त्याचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे".
टॉयलेट क्लीनरच्या जाहिरातीमधून मिळालेल्या कमाईबद्दल विचारले असता तो म्हणाला, "मी इतकी कमाई केली की, मी स्वतःसाठी वांद्रे येथे घर घेतले. आजही माझ्याकडे स्वतःची कार नाही. मी ओला, उबरने प्रवास करतो आणि माझ्याकडे एक इलेक्ट्रिक सायकल आहे. बायकोकडे कार आहे, ती मुलांना शाळेतून आणण्यासाठी तिचा वापर करते. मला साधं आयुष्य जगायला आवडतं". दरम्यान, विशालने 'कॉन्स्टेबल गिरपडे', 'मीठा खट्टा प्यार हमारा' आणि 'बंदा ये बिंदास है' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या त्याचे स्वतःचे 'The Vishal Hour' नावाचे पॉडकास्ट आहे.