'थामा'ला मिळाला दिवाळी बोनस, दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली तब्बल 'इतकी' कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:00 IST2025-10-23T09:59:56+5:302025-10-23T10:00:38+5:30
आयुषमान - रश्मिका मंदानाच्या थामा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. जाणून घ्या

'थामा'ला मिळाला दिवाळी बोनस, दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली तब्बल 'इतकी' कमाई
यंदाची दिवाळी आणि सणासुदीच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. मॅडॉक फिल्म्सचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार ओपनिंग करत आपला दबदबा निर्माण केला आहे, तर कमी बजेटमधील ‘एक दीवाने की दीवानियत’ या चित्रपटानेही अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवले आहे. दुसरीकडे, ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ अजूनही बॉक्स ऑफिसवर आपला जलवा कायम ठेवून आहे.
‘थामा’ ची यशस्वी सुरुवात
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ‘थामा’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी भीती आणि विनोदाचा शानदार अनुभव घेऊन आला आहे. आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी, २४ कोटी रुपयांची कमाई केली, जी आयुष्मान खुरानाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग ठरली. दुसऱ्या दिवशी, बुधवारी या चित्रपटाने १८.१ कोटी रुपये कमावले.
अशा प्रकारे, पहिल्या दोन दिवसांत ‘थामा’ची एकूण कमाई ४२.१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सुमारे १५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे अधिक बळ मिळाले आहे. ‘थामा’ सिनेमा हा मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील एक सिनेमा आहे, ‘थामा’च्या शेवटी या युनिव्हर्समधील आगामी सिनेमा 'शक्ती शालिनी'ची घोषणा झाली आहे. यात सैयारा स्टार 'अनीत पड्डा' प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.