सैफ अली खानला बनायचंय पंतप्रधान, पाहा तांडवचा ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 18:08 IST2021-01-04T18:06:32+5:302021-01-04T18:08:35+5:30

तांडव या वेबसिरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या वेबसिरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Tandav trailer: Saif Ali Khan unleashes anarchy in Amazon’s new show | सैफ अली खानला बनायचंय पंतप्रधान, पाहा तांडवचा ट्रेलर

सैफ अली खानला बनायचंय पंतप्रधान, पाहा तांडवचा ट्रेलर

ठळक मुद्देतांडव वेबसिरिजमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत तर ही वेबसिरिज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली आहे.

सैफ अली खानने हम साथ साथ है, दिल चाहता है, ओमकारा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याने चित्रपटांप्रमाणे वेबसिरिजमध्ये देखील त्याचा दबदबा निर्माण केला आहे. सेक्रेट गेम्स या त्याच्या वेबसिरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या सिरिजचा दुसरा सिझन देखील प्रचंड गाजला. आता सैफ अली खानची तांडव ही नवी वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसिरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या वेबसिरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

तांडव वेबसिरिजमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत तर ही वेबसिरिज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली आहे. अली अब्बास जाफरनेच हिमांशू किशन मेहरा यांच्यासोबत या वेबसिरिजची निर्मिती केली आहे. तांडव ही वेबसिरिज एक पॉलिटिकल ड्रामा आहे.

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक राजकीय कथांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. तांडवदेखील खुर्चीसाठी भांडणाऱ्या काही लोकांची कथा आहे. खुर्ची मिळवण्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार आहे. सैफ अली खान आणि डिम्पल कपाडिया यांच्यात खुर्ची मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असणार आहे. 

तांडव ही वेबसिरिज प्रेक्षकांना १५ जानेवारीला ॲमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे. या वेबसिरिजमध्ये सुनील ग्रोव्हर, गौहर खान, अमायरा दस्तूर, मो जीशान अयूब, डिनो मोरियो, अनूप सोनी, हितेन तेजवानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजद्वारे डिम्पल कपाडिया ओटीटीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. तसेच भारत, टायगर जिंदा है, सुलतान यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा अली अब्बास जाफर पहिल्यांदाच एका वेबसिरिजचे दिग्दर्शन करणार आहे.

तांडव या वेबसिरिजचा ट्रेलर खूपच इंटरेस्टिंग दिसत असल्याचे लोक सोशल मीडियावरील कमेंटद्वारे सांगत आहेत.

Web Title: Tandav trailer: Saif Ali Khan unleashes anarchy in Amazon’s new show