"आपल्यामधलं हे प्रेम..." सुश्मिता सेनसाठी रोहमन शॉलची पोस्ट, म्हणाला…
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:28 IST2025-07-29T14:27:44+5:302025-07-29T14:28:10+5:30
रोहमन शॉलने पहिल्यांदाच सुश्मितासोबतच्या नात्यावर थेट भाष्य केलं आहे.

"आपल्यामधलं हे प्रेम..." सुश्मिता सेनसाठी रोहमन शॉलची पोस्ट, म्हणाला…
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी सुश्मिता सेन (Sushmita Sen) कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ललित मोदी आणि विक्रम भट यांच्याशी जोडलेले नाते असो किंवा तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेला रोहमन शॉल. सुश्मिताचं प्रेमप्रकरण नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलं आहे. सुश्मिता आणि रोहमन यांचं नातं जवळपास तीन वर्षं टिकलं. मात्र, २०२१ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले, पण दोघांनी त्यांच्या नात्याबाबत फारसं उघडपणे बोलणं टाळलं. आता, रोहमन शॉलने त्यांच्या नात्यावर पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. त्यांच्या मैत्रीला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने रोहमनने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
रोहमनने इन्स्टाग्रामवर सुश्मिता सेन हिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये. पण, ही पोस्ट त्यानं सुश्मिता सेनला टॅग केलीय. या पोस्टमध्ये त्यानं लिहलं, "सात वर्षे पूर्ण! काही गोष्टींची नाव बदलतात. पण, त्यांचा अर्थ मात्र कायम असतो. मी तुला बुद्धिबळ शिकवलं आणि आता तू मला बिनदिक्कत हरवतेस. तू मला पोहायला शिकवलंस, पण पाण्याला घाबरणाऱ्या एका माणसाला तू भावनिकदृष्ट्याही आणि खर्या अर्थानंही खोल पाण्यात उतरवलंस. तू मला आतापर्यंतचे सर्वोत्तम हेअरकट्स दिलेस, हे तर मी विसरू शकत नाही"
पुढे त्यानं लिहलं, "आपण एकमेकांबरोबर आपली भीती, ताकद आणि सगळंच वाटून घेतलं. या सगळ्यातून एक असं नातं तयार झालं, जे कोणत्याच लेबलमध्ये बसत नाही. एकेकाळी तू माझं सुरक्षित स्थान होतीस आणि कदाचित अजूनही आहेस. आपल्यामध्ये असलेल्या प्रेमासाठी आणि आजही टिकून असलेल्या त्या मैत्रीसाठी मी मनापासून आभारी आहे", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्यात. सुश्मिता सेन आणि रोहमन यांचं नातं जरी बदललं असलं, तरी त्यांच्यातील आपुलकी आणि मैत्रीचं बंध अजूनही तसंच टिकून आहे, हे या पोस्टवरून दिसून येतं.