कॉन्ट्रास्ट जोड्यांचा सुपरहिट फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 05:58 IST2016-11-17T05:58:28+5:302016-11-17T05:58:28+5:30

बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत, ज्या आॅनस्क्रीन खूपच रोमाँटिक वाटतात. गेल्या काही काळात आलेल्या चित्रपटांचा विचार केल्यास त्यामध्ये

SuperHit Formula for Contrast Pairs | कॉन्ट्रास्ट जोड्यांचा सुपरहिट फॉर्म्युला

कॉन्ट्रास्ट जोड्यांचा सुपरहिट फॉर्म्युला

बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत, ज्या आॅनस्क्रीन खूपच रोमाँटिक वाटतात. गेल्या काही काळात आलेल्या चित्रपटांचा विचार केल्यास त्यामध्ये दाखविण्यात आलेल्या कॉन्ट्रास्ट जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या जोड्या प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच रुची निर्माण करीत आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही जोड्यांची भेट घालून देणार आहोत, ज्या काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
धनुष-सोनम कपूर
तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार धनुष याने २०१३ मध्ये आलेल्या ‘रांझणा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. चित्रपटात त्याची जोडी फॅशन आयकॉन सोनम कपूर हिच्यासोबत होती. दोघांची जोडी रोमाँटिक कपल म्हणून बघितली जात नव्हती. अशातही त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना जबरदस्त भावली.
इमरान खान-करिना कपूर
जेव्हा ‘एक मै और एक तू’ या चित्रपटाची स्टार कास्ट घोषित करण्यात आली, तेव्हा इमरान खानच्या अपोझिट त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या करिनाचे नाव पुढे आले अन् सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र, जेव्हा ७० एमएम स्क्रीनच्या पडद्यावर दोघांची लव्ह स्टोरी रंगली तेव्हा सगळ्यांनीच या जोडीचे कौतुक केले. सुरुवातीला कॉन्ट्रास्ट समजल्या जाणाऱ्या या जोडीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.
आमिर खान-साक्षी तन्वर
मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानचा आगामी दंगल हा चित्रपट त्याच्या कथानकावरून जेवढा चर्चेत आहे, तेवढाच आमिरच्या रील लाइफ पार्टनरवरूनदेखील चर्चेत आहे. चित्रपटात आमिरची जोडी साक्षी तन्वर हिच्यासोबत दाखविण्यात आली आहे. वास्तविक साक्षीची खरी ओळख छोटा पडदा आहे. अशात ती थेट सुपरस्टार आमिर खान याच्यासोबत त्याची रील लाइफ पार्टनर म्हणून झळकत असल्याने ती चर्चेत आहे. रिअल लाइफ कपल महावीर सिंग फोगाट आणि गीता फोगाट यांच्यासारखीच रिल लाइफ जोडी दिसावी, हा या मागचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचे समजते.
रितेश देशमुख-नर्गिस फाखरी
मुळात रितेश देशमुख याची खरी ओळख कॉमेडी अ‍ॅक्टर अशी आहे. मात्र, बॅँजो या चित्रपटात तो बॉलिवूडमधील सर्वांत ग्लॅमरस अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्यासोबत बघावयास मिळाला. चित्रपटाने फारसे यश मिळवले नसले, तरी दोघांची केमिस्ट्री कौतुकास्पद ठरली. प्रेक्षकांना रितेश अन् नर्गिसचा अंदाज आवडला.
रणबीर कपूर-ऐश्वर्या राय
नुकताच रिलीज झालेल्या अन् वादग्रस्त ठरलेल्या करण जोहर यांच्या ‘ए दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांची कॉन्ट्रास्ट जोडीही चांगलीच चर्चेत आली. दोघांची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रणबीरसोबत ऐश्वर्याने केलेला अभिनय कौतुकास पात्र ठरला.
राम कपूर-सनी लिओनी
इंडियन टेलिव्हिजन जगातील संस्कारी पुरुष म्हणून ओळख असलेला राम कपूर चक्क अ‍ॅडल्ट स्टार सनी लिओनी हिच्यासोबत झळकला. ‘कुछ कुछ लोचा है’ या चित्रपटात त्याने सनीसोबत जबरदस्त रोमांस केला. या दोघांची जोडी त्यावेळी चर्चेचा विषय ठरली.
राहुल बोस-प्रियांका चोप्रा
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही स्वत:चा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्रा हिने इंडस्ट्रीमधील प्रत्येक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. मात्र, ती ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात चक्क राहुल बोस याच्यासोबत बघावयास मिळाली. विशेष म्हणजे दोघांमधील केमिस्ट्री चांगलीच जमली होती.
नसिरुद्दीन शाह-विद्या बालन
‘डर्टी पिक्चर’ आणि ‘इश्किया’ या दोन्ही चित्रपटांत आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या नसिरुद्दीन शहा यांच्याबरोबर अभिनेत्री विद्या बालन हिने जबरदस्त रोमांस केला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. वास्तविक नसिरुद्दीन शहा यांना चरित्र अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांची विद्यासोबतची केमिस्ट्री थक्क करणारी होती.

Web Title: SuperHit Formula for Contrast Pairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.