सुशांत सिंह राजपूतनंतर कार्तिक आर्यनचं करिअर संपवण्याचा प्रयत्न? सुनील शेट्टीनं दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:22 IST2025-12-31T09:17:08+5:302025-12-31T09:22:05+5:30
बॉलिवूडमध्ये चालतोय 'नेगेटिव्ह पीआर'चा खेळ, कार्तिक आर्यनला केलं जातंय टार्गेट?

सुशांत सिंह राजपूतनंतर कार्तिक आर्यनचं करिअर संपवण्याचा प्रयत्न? सुनील शेट्टीनं दिले संकेत
Suniel Shetty : ऐन उमेदीत, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला. १४ जून २०२० ला सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं. त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली की मृत्यूमागे काही वेगळे कारण होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि बाहेरील कलाकारांना मिळणारी वागणूक हा विषय प्रचंड चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार अभिनेता कार्तिक आर्यन सोबत घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. अभिनेता सुनील शेट्टीनं एका व्हायरल व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नुकतंच कार्तिक आर्यनचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध नकारात्मकतेची लाट पाहायला मिळाली. यातच सोशल मीडियावर एक रील व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये कार्तिकविरोधात मुद्दाम नकारात्मक अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने कार्तिक आर्यनविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या 'नेगेटिव्ह पीआर'वर एक व्हिडीओ बनवला. ज्यामध्ये म्हटलंय, "जर कोणाला चित्रपट आवडला नाही, तर त्यावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण एखाद्या कलाकाराला सतत 'फेक पीआर प्रॉडक्ट' म्हणून दाखवणे चुकीचे आहे. मला विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की, अनेक निर्माते आणि प्रसिद्ध यूट्यूबर्सना पैसे देऊन एखाद्या कलाकाराची प्रतिमा मलिन करणारे व्हिडीओ बनवण्यास सांगितले जाते".
इन्फ्लुएन्सरनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "हा प्रश्न चित्रपट आवडतो की नाही याचा नाही. टीका कुठे थांबते आणि क्रूरता कुठे सुरू होते, हा खरा मुद्दा आहे. तुम्ही कथेवर, गाण्यांवर किंवा पटकथेवर टीका करा, पण एखाद्या बाहेरील व्यक्तीचे करिअर संपवण्यासाठी वैयक्तिक द्वेष पसरवणे भयंकर आहे. पैसा देऊन आवाज दाबणे किंवा पात्राची बदनामी करणे सिनेमॅटिक प्रामाणिकपणाला साजेसं नाही". महत्त्वाचे म्हणजे या रीलला अभिनेता सुनील शेट्टीने लाईक केले आहे. त्यामुळे तो या मताशी सहमत असल्याचे संकेत मिळत आहेत.