काळ्याच नाही तर पांढरे केसांमध्येही रूपेरी पडद्यावर बनले स्टायलिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 20:51 IST2016-12-23T14:56:39+5:302016-12-24T20:51:50+5:30
अमिर खान मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सिनेमात काही तरी वेगळे करणे ...

काळ्याच नाही तर पांढरे केसांमध्येही रूपेरी पडद्यावर बनले स्टायलिश
मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सिनेमात काही तरी वेगळे करणे हीच आमिर खानची खासियत. प्रत्येक सिनेमातील त्याचा निरनिराळा अंदाज रसिकांना कायम भावलाय. आजवर त्याने साकारलेले विविध लूक्स आणि भूमिकांनी रसिकांची मने जिंकली आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी मेहनत करुन त्यात जीव ओतण्याचं काम आमिर करतो. त्यामुळेच की काय मिस्टर पर्फेक्शनिस्ट असे बिरुद त्याच्या नावाभोवती मानाने लावले जाते. 'दंगल' सिनेमातही त्याच्या परफेक्टपणाची झलक पाहायला मिळते. या सिनेमात कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी आमिरने बरीच मेहनत घेतली. महावीर फोगट यांच्या भूमिकेत त्याने जीवच नाही तर अक्षरक्षा प्राण ओतला. महावीर फोगट यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक बारीकसारीक गोष्टी अगदी अचूकपणे निरीक्षण करुन आमिरने रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. या भूमिकेसाठी आमिरने तर चक्क आपल्या वयाने कितीतरी मोठे असलेले महावीर फोगाटही साकारले आहेत. महावीर फोगाट यांच्या वयानुसारच त्याने लूक साकारल्याचे पाहायला मिळत आहे. वयोमानानुसार पांढरे झालेले केस आणि कुर्ता परिधान केलेला आमिरचा हा अवतारही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो आहे.
अनिल कपूर
'झक्कास' अनिल कपूर याचे आजही चिरतरुण असणे ही खासियत. आजही अनिल कपूरचा उत्साह, एनर्जी आणि त्याचे चार्मिंग दिसणे तरुण कलाकारांनाही लाजवेल असाच असतो. त्याची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. हिंदी सिनेमातील विविध भूमिकांनी अनिल कपूरने रसिकांची मने तर जिंकलीच आहेत. त्याची प्रत्येक भूमिका खास असते.'दिल धडकने दो' या सिनेमात त्याने मिडल-एज व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याच्या वयाला साजेशी ही भूमिका असली तरीही पहिल्यांदाच अनिल कपूर पांढ-या केसात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाला. पांढरे केस आणि सूट बूटातला अनिलचा अंदाजही तितकाच भाव खाऊन गेला.
अजित कुमार
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जवळपास सगळेच नायक जबरदस्त एनर्जीचे असतात. याच एनर्जीमुळे त्यांच्यातील अभिनयाला चारचाँद लागतात आणि हा अभिनय रसिकांना भावतो. मात्र भूमिका कोणतीही असो त्याला न्याय देण्यासाठी झटणारा कलाकार म्हणजे अजित कुमार. आपल्या पांढ-या केसाची जराही पर्वा न करता अभिनय करणारा अभिनेता अशी त्याची ओळख. याच अंदाज अजित कुमारने भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षीचा 'वेदामल' हा त्याचा सिनेमा सुपरहिट ठरला.
शाहरूख खान
हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशाह म्हणजे किंग खान शाहरुख. शाहरुखची प्रत्येक स्टाईल, प्रत्येक अदा, प्रत्येक संवाद रसिकांना भावतो. आजवरील शाहरुखच्या विविध भूमिकांनी रसिकांची मने जिंकली आहेत. मात्र 'वीरझारा' सिनेमात रोमान्सच्या या बादशाहचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. तरुण आणि वयोवृद्ध अशा दोन्ही वयातील भूमिका शाहरुखने या वीरझारा सिनेमात साकारल्या. वृद्ध शाहरुखचा रोमान्सही रसिकांची मने जिंकून गेला.पांढरे केस, चेह-यावरील सुरकुत्या, थकलेले शरीर, कापणारे हात असा शाहरुख रसिकांना भावला.
नसिरूद्दीन शहा
सिनेमात अगदी सुरूवातीपासूनच नसिरूद्दीन शहा यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी चतुरस्त्र अभिनयाने सरसाज चढवला.आजही नसिरुद्धीन शाह त्यांच्या लूक्ससाठी नाही तर चोखंदळ अभिनयासाठी ओळखले जातात त्यांनी साकारलेल्या भूमिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले आहे. विविधरंगी भूमिका साकारणा-या नसिरसाहेबांनी आपल्या पांढ-या केसांना कधीही लपवले नाही.भूमिकेला साजेशा गेटअपमध्येच ते पाहायला मिळाले.आपल्या पांढ-या केसांनाही त्यांनी स्टाईल बनवली, त्यामुळे हे सगळे कलाकार त्यांच्या अभिनय कौशल्यामुळेच इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.