कधी कधी सगळं स्वप्नच वाटतं - बोमन इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2016 11:42 AM2016-06-27T11:42:38+5:302016-06-27T17:12:38+5:30

बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक ...

Sometimes everything looks like a dream - Boman Irani | कधी कधी सगळं स्वप्नच वाटतं - बोमन इराणी

कधी कधी सगळं स्वप्नच वाटतं - बोमन इराणी

googlenewsNext
मन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवुडमध्ये आज त्यांनी त्यांच्या अभिनयाने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. बोमन यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
फोटोग्राफर असताना अभिनयक्षेत्रात येण्याचा विचार कसा केला?
- मी फोटोग्राफी करत होतो आणि मला खूप चांगली कामेही मिळत होती. पण माझा कल हा अभिनयाकडे होता. मी अनेक चित्रपट पाहात असे. तसेच नाटकांचे वाचन करत असे. चित्रपट पाहिल्यावर त्यांची समीक्षा लिहित असे. एखादा फिल्म इन्स्टिट्युटमधला विद्यार्थी ज्या काही गोष्टी करतो, त्या गोष्टी मी करत असे. अभिनयक्षेत्रात जाण्याचा मी नेहमीच विचार करत होतो. पण एका क्षणाला मला वाटले की, आपण या क्षेत्रात जाऊन पाहावे. आपल्याला अभिनय नाहीच जमला तर आपण आपल्या फोटोग्राफीकडे पुन्हा वळूया. मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट करतानादेखील हाच विचार माझ्या डोक्यात होता. चाळीस दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर मी पुन्हा फोटोग्राफीला सुरुवातदेखील केली होती. माझे या चित्रपटातील काम आवडल्यामुळे निर्मात्यांचे, दिग्दर्शकांचे अनेक फोन मला येऊ लागले. चित्रपटांच्या चांगल्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यामुळे मी या क्षेत्रात भविष्यातही काम करण्याचे ठरवले. मी हा चित्रपट केला त्यावेळी अभिनयक्षेत्रात मी अनेक वर्षं टिकेल असे मला वाटलेदेखील नव्हते.
तुम्ही चाळिशी उलटल्यानंतर अभिनयक्षेत्रात आलात. तुमचे वय तुमच्या कारकिर्दीच्या आड येऊ शकते असे तुम्हाला वाटले नव्हते का?
वय हे कोणत्याही बाबतीत आड येऊच शकत नाही असे मला वाटते. वयाबाबतीत समाजाने काही मर्यादा आखून ठेवल्या आहेत. इतक्या वर्षांत लग्न झाले पाहिजे, इतक्या वयात मुलगा करियरमध्ये स्थिरस्तावर झाला पाहिजे या गोष्टी समाजात मानल्या जातात. पण या सगळ्या गोष्टींना वैयक्तिक आयुष्यात महत्त्व असते असे मला वाटत नाही. तुम्हाला ज्या वयात जी संधी मिळेल त्या संधीचे तुम्ही सोने केले पाहिजे असे माझे मत आहे. त्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये उशिरा आलो असे मला कधीच वाटत नाही.
आजच्या नव्या पिढीबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल?
कोणतीही भूमिका साकारताना दुसऱया कोणत्याही कलाकाराची नक्कल करू नये असे मी नेहमीच सांगतो. आजच्या पिढीला आत्मविश्वात आणि अतिआत्मविश्वास यात खूप फरक आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. अनेकवेळा मला काहीजण भेटतात आणि माझ्याकडे निर्मात्यांचे फोन नंबर मागतात. त्यावर तुम्ही आधी काही काम केले आहे का असे विचारल्यावर आम्ही काहीही केलेले नाही. पण आम्हाला चित्रपटात काम करायचे आहे असे त्यांचे उत्तर असते. माझ्यामते चित्रपटात येण्यापूर्वी रंगमंचावर काम करणे अथवा वर्कशॉपमध्ये अभिनय शिकणे हे गरजेचे आहे. तुमचा पाया मजबूत नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक कलाकाराने सर्वप्रथम मला अभिनेता बनायचे आहे असा विचार करायला हवा. तुम्ही स्टार बनणार की नाही हे प्रेक्षकांच्या हातात असते. मला स्टार बनायचे आहे हा विचार करून इंडस्ट्रीत येणारे कधीच टिकू शकत नाहीत.
तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कॅमेऱयाला सामोरे गेलात त्यावेळेचा अनुभव कसा होता?
मी खरे तर खूप घाबरलेलो होतो. अभिनय करता येत असला तरी चित्रपट चित्रीत करताना जे काही तंत्रज्ञान वापरले जाते याची मला काहीच कल्पना नव्हती. सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. पण हळूहळू मी शिकत गेलो आणि त्यामुळे माझे दडपण कमी होत गेले. आजही मला सगळे येते असे मी म्हणणार नाही, मी आजही शिकतच आहे.
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर कोणासोबत काम करण्याची तुमची इच्छा होती?
मी बलराज सहानी यांचा खूप मोठा फॅन आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्यांच्यासोबत मी केवळ कामच केले नाही तर भूतनाथ या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्यासोबत मी झळकलो होतो. आपण ज्या व्यक्तिचे चाहते आहोत, त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा, त्यांच्यासोबत पोस्टरवर झळकण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. अनेकवेळा हे सगळे खरे आहे का? मी कोणत्या स्वप्नात तर नाही ना असा मी विचार करतो. 
* तुमचा मुलगाही आता इंडस्ट्रीत आला आहे. तुम्ही त्याला काय मार्गदर्शन देताय?
- मी माझ्या मुलाला केवळ दोनच गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कितीही मेहनत करायला लागली तरी मेहनत करण्याची तयारी ठेव आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्यासोबत लोकांना काम करायला आवडेल असेच सगळ्यांशी वाग. 

Web Title: Sometimes everything looks like a dream - Boman Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.