तर या पहेलवानने आमिरला 'दंगल'साठी शिकवलीय कुस्ती जाणून घ्या या पेहलवान विषयी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:54 IST2016-12-09T16:27:24+5:302016-12-09T17:54:32+5:30
बॉलीवुड आणि इंदूरचे खास कनेक्शन आहे. अनेक सेलिब्रिटींचं इंदूरशी जवळचे नाते आहे किंवा त्या सेलिब्रिटी इंदूरच्या आहेत. आता इंदूरचे ...

तर या पहेलवानने आमिरला 'दंगल'साठी शिकवलीय कुस्ती जाणून घ्या या पेहलवान विषयी?
'दंगल' सिनेमासाठी पहिल्यांदाच विचारणा झाली त्यावेळी काय प्रतिक्रिया होती?
'दंगल' सिनेमासाठी आमिर खान प्रॉडक्शन्सकडून ज्यावेळी फोन आला त्यावेळी मला त्यावर विश्वासच बसला नाही. कुणी तरी आपली मस्करी करत असेल असा विचार करुन मी फोन कट केला. त्यानंतर पुन्हा आठवड्याभराने फोन आला. त्यावेळी मला सांगण्यात आले की आमिर खान यांना मला भेटायचे आहे. दंगल सिनेमा येत आहे हे मला माहिती होते. त्यामुळे ठरल्या वेळेनुसार मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. सिनेमाविषयी आणि अन्य गोष्टींविषयी चर्चा झाली. प्रॉडक्शनचे लोक तिथे होते. सिनेमा आणि कुस्ती संदर्भात मला विविध प्रकारचे प्रश्न विचारत होते. ज्या बारकाईने आणि तांत्रिकदृष्ट्या ते प्रश्न विचारत होते त्यावरुन मला वाटले की हे लोक बराच अभ्यास करुन आले आहेत. ख-या कुस्तीपटूचा कान कसा कुटतो हे त्यांना माहिती होतं. यावरुन मला खात्री पटली यांना कुस्ती आणि खेळाची पूर्ण समज तसेच जाण आहे. त्यात आमिर त्याच्या सिनेमाविषयी आणि कथेबाबत चोखंदळ असतो. त्यामुळे सर्व नियमांसह कुस्ती रुपेरी पडद्यावर दाखवणे एक आव्हान होते.मी रेल्वेविभागात नोकरीही करतो सिनेमाच्या शूटिंगसाठी रेल्वे विभागाकडू मला 14 महिन्यांची सुट्टी मिळाली होती.
कलाकारांना कुस्ती शिकवणं किती आव्हानात्मक वाटले?
आमिर खानला कुस्ती शिकवणे मला फार काही अवघड वाटले नाही. सुरुवातीला वाटले की आमिर तर एक अभिनेता आहे तो कसा काय कुस्ती करेल असा प्रश्न मला पडला. 'ऑलिम्पिक' असो किंवा 'कॉमनवेल्थ' दर्जाची कुस्ती एका कलाकारांना जमेल का असाही प्रश्न होता. त्यावेळी मी सांगितले की महिला रेसलर घ्या आणि त्यांच्याकडून अभिनय करुन घ्या. त्यावेळी हजारो तरुणींचे ऑडिशन्स घेण्यात आले. ज्यावेळी ऑडिशन्समधून निवडण्यात आलेल्या तरुणींना जेव्हा मी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली त्यावेळी मला कळले की या मुलींमध्ये काही तरी खास बात आहे. वेगळी कॅचिंग पॉवर आहे. कलाकार मंडळी कुस्ती खेळू शकत नाही हा माझा गैरसमज दूर झाला. कुस्तीसाठी वेगळा स्टॅमिना लागतो. त्यामुळे मोठं ट्रेनिंग कार्यक्रम मी आखून दिला. विविध कॅम्पचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक राष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीपटूला ज्या नियमांचं पालन करावं लागते त्यानुसार त्यावेळी ट्रेनिंग घेण्यात आली.
महावीर फोगाट यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे, तर त्यांची आणि तुमची भेट झाली होती ?
सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी महावीर फोगाट सेटवर आले होते. त्यांचा आणि माझा परिचय होता. ते मला चांगल्यारितीने ओळखत होते. कारण त्यांचा चंदीग्राम आखाड्याशी संबंध होता तर मीसुद्धा चंद्रीग्रामचा चेला. आम्ही दोघे गुरुबंधू.. त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोठी होती. कृपा आहे तर सिनेमा उत्तम दर्जाचा बनणारच असे त्यांनी म्हटले होते.
आमिर खानला कुस्ती शिकवणे किती आव्हानात्मक होते?
सिनेमात आमिर खानला कुस्तीचे प्रशिक्षण देणे एक मोठं आव्हान होते. त्यात आमिरला सिगारेटचे व्यसन होते. प्रशिक्षक असल्याने मला धूम्रपान बिल्कुल मान्य नाही. मी त्यांना सांगितले की प्रशिक्षण घ्यायचे असेल तर सिगारेट सोडावी लागेल, त्यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होईल असे त्यांना मी सांगितले. महावीर फोगाट यांची भूमिका साकारणे यामुळे खूप सहज आणि सुलभ होईल असे मी त्यांना पटवून दिले आणि आमीरने मोठ्या मनाने ते समजून घेतले. त्यामुळे शुटिंगची सगळी प्रक्रिया सुलभरित्या पार पडली.
'सुलतान', 'दंगल' या सिनेमांमुळे कुस्तीला काय फायदा होतो आहे?
सुलतान सिनेमात खरी कुस्ती दाखवण्यात आली होती का याबाबत मी साशंक आहे. मात्र दंगल सिनेमात खरी कुस्ती दाखवण्यात आली आहे. या सिनेमांमुळे कुस्तीचा आणि खेळाचा प्रचार-प्रसारास मदत होणार आहे. ऑलिम्पिक आधी सुलतान सिनेमा आला होता. सुलताननंतर साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला. सिनेमामुळे कुस्तीची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. मानसिकदृष्ट्याही याचा कुस्तीपटूंना फायदा झाला. आमिरने आपल्या या 'दंगल' सिनेमात खरी कुस्ती दाखवली आहे. कुस्ती आणि या खेळाला योग्यरित्या लोकांपर्यंत नेण्याची गरज आहे असे मला वाटते. चुकीच्या पद्धतीने हा खेळ रुपेरी पडद्यावर मांडला जाऊ नये अशी मनोमन इच्छा होती. याआधी ब-याच सिनेमात मग ते 'चमेली की शादी' असो किंवा इतर दुसरा कोणताही सिनेमा यांत पहेलवानला गुंड किंवा वाईट पद्धतीने दाखवण्यात आले होते. मात्र कुस्तीला आजवर योग्यरित्या दाखवण्यात आले नव्हते. दंगल सिनेमात मात्र ही प्रथा मोडून योग्यरित्या कुस्ती दाखवण्यात आली आहे. 'दंगल' हा सिनेमा जगभर दाखवला जाईल. विविध भाषांमधील लोक हा सिनेमा पाहतील. त्यामुळे कुस्ती खेळणा-या अनेक देशात याचा प्रचार आणि प्रसार होईल. सिनेमात कुस्ती दाखवण्यात आल्याने आमच्यासारख्या प्रशिक्षकांचे काम मात्र वाढले आहे. आज प्रत्येकालाच कुस्ती शिकायची आहे. हा खूप चांगला बदल आहे. हे पाहून खूप चांगले वाटते. कुस्ती खेळात नवक्रांती येईल आणि याची सुरुवात झाली आहे.
'सुलतान'मध्ये सलमान आणि 'दंगल'मध्ये आमिर दोघांच्या कुस्ती कौशल्याबद्दल काय वाटते?
'सुलतान' या सिनेमात कुस्ती कितपत दाखवली याबाबत खरेच मला शंका आहे. सलमानला या सिनेमात कुस्ती खेळताना सा-यांनी पाहिले. मात्र यांत त्याने कुस्ती खेळण्यापेक्षा कुस्ती खेळल्याचा अभिनय केला असे मला वाटते. मात्र 'दंगल' सिनेमात आमिर सर्वार्थाने कुस्ती जगलाय. सलमानपेक्षा कुस्तीमध्ये आमिरचे सरस वाटला असे मला वाटते. सुलतानमध्ये सलमानपेक्षा अनुष्काने चांगल्या पद्धतीने कुस्ती खेळली. जी गोष्ट अनुष्काच्या कुस्तीमध्ये दिसली ती सलमानच्या कुस्तीमध्ये काही दिसली नाही असे वाटते. सलमान फक्त कुस्तीचा अभिनय करत होता.