Exclusive: "अक्की भाई प्रयत्न करतोय पण...", अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर मित्र श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया
By ऋचा वझे | Updated: January 16, 2025 17:12 IST2025-01-16T17:11:34+5:302025-01-16T17:12:45+5:30
अक्षयच्या करिअरमधील या टप्प्याविषयी नुकतंच श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) 'लोकमत फिल्मी' ला प्रतिक्रिया दिली आहे.

Exclusive: "अक्की भाई प्रयत्न करतोय पण...", अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर मित्र श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया
'खिलाडी' कुमार अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar). गेल्या काही वर्षांपासून अक्षयचे ८ ते १० सिनेमे फ्लॉप झाले आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या बिग बजेट सिनेमात तर तो टायगर श्रॉफसोबत दिसला. पण तरीही सिनेमा आपटला. याशिवाय 'राम सेतू', 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षा बंधन', 'सेल्फी' हे सिनेमे चालले नाहीत. आता तो आगामी काही विनोदी सिनेमांमध्ये दिसणार आहे. त्या सिनेमांकडून सर्वांनाच अपेक्षा आहे. अक्षयच्या करिअरमधील या टप्प्याविषयी नुकतंच श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) 'लोकमत फिल्मी' ला प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमार आणि श्रेयस तळपदे घट्ट मित्र आहेत. दोघंही आगामी एका सिनेमात एकत्र कामही करत आहेत. तर श्रेयस 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहे. दरम्यान 'लोकमत फिल्मी'शी बोलताना श्रेयस म्हणाला, "हे सगळ्यांच्या बाबतीत घडतंच. करिअरमध्ये असा एक टप्पा येतो जेव्हा सिनेमा चालत नाही. स्वत: अक्षयच याचं उदाहरण आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याचे सलग १६-१७ सिनेमे चालले नव्हते. पण त्यातून बाहेर आलाच. अगदी बच्चन सर सुध्दा सुटलेले नाहीत."
तो पुढे म्हणाला, "आमच्या क्षेत्रात अनिश्चितता आहे ते हेच आहे. दिवस येतो मग रात्र येते पण नंतर पुन्हा दिवस उगवतोच. तर प्रयत्न करत राहिले पाहिजे. अक्की भाईही तेच करतोय. 'सरफिरा','खेल खेल मे' असे वेगळे सिनेमेही त्याने आणलेच. लोकांना आवडेल असं काम करायचाच आमचा प्रयत्न असतो. कधी ते यशस्वी होत कधी होत नाही त्यामुळे प्रयत्न करणं सोडता कामा नये."
अक्षय कुमार आणि श्रेयस तळपदे 'वेलकम टू जंगल' सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी 'हाऊसफुल २' मध्ये काम केलं आहे. श्रेयसची गेल्यावर्षी तब्येत बरी नसताना अक्षयने त्याला खूप धीर दिला होता. दोघांच्या मैत्रीविषयी सगळ्यांनाच माहित आहे.