'शोले'तला 'वीरू' बनण्यासाठीच धर्मेंद्र यांचा झाला होता जन्म! दिग्दर्शकाने कास्टिंगबाबत केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:16 IST2025-11-25T12:15:08+5:302025-11-25T12:16:38+5:30
Actor Dharmendra : बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८९ वर्षी त्यांचे निधन झाले असून सिनेइंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

'शोले'तला 'वीरू' बनण्यासाठीच धर्मेंद्र यांचा झाला होता जन्म! दिग्दर्शकाने कास्टिंगबाबत केला खुलासा
बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांनी २४ नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८९ वर्षी त्यांचे निधन झाले असून सिनेइंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. प्रत्येकजण धर्मेंद्र यांच्याशी संबंधित किस्से आणि कथांबद्दल बोलत आहे. यादरम्यान, 'शोले' (Sholey Movie) चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांनी धर्मेंद्र यांची आठवण काढत 'शोले'मधील त्यांचे 'वीरू' हे पात्र आणि ते या भूमिकेसाठी कसे निवडले गेले, याबद्दल सांगितले.
'शोले'मध्ये धर्मेंद्र यांनी 'वीरू'ची आयकॉनिक भूमिका साकारली होती, जी चित्रपट प्रदर्शित होऊन ५० वर्षे उलटूनही आजही स्मरणात आहे. आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे हे पात्र कायमस्वरूपी अमर झाले आहे. यादरम्यान, एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत 'शोले'चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी धर्मेंद्र यांची आठवण काढली आणि 'शोले'मधील त्यांच्या कास्टिंगबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे.
अशाप्रकारे धर्मेंद्र 'शोले'चे वीरू बनू शकले...
रमेश सिप्पी म्हणाले, ''शोलेमध्ये धर्मेंद्र यांची निवड आधीच निश्चित झाली होती. मी यापूर्वी त्यांच्यासोबत 'सीता और गीता' चित्रपट केला होता आणि मी पटकथा लेखक सलीम खान-जावेद अख्तर यांना आधीच सांगितले होते की, 'सीता और गीता'मधील तीन कलाकारांना मी 'शोले'मध्ये पुन्हा घेईन. यामध्ये संजीव कुमार, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नावाचा समावेश होता. जसा-जसा चित्रपटाची कथा लिहिली गेली, तशी त्यात जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या पात्रांची एन्ट्री झाली आणि नंतर अमजद खान यांच्या 'गब्बर सिंग'च्या भूमिकेला अंतिम रूप देण्यात आले.''
अशाप्रकारे धर्मेंद्र 'शोले'चे वीरू बनू शकले. 'शोले'मध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती, जी नेहमीच लक्षात ठेवली जाईल यात कोणतीही शंका नाही. एका अर्थाने, 'शोले'चा वीरू बनण्यासाठीच धर्मेंद्र यांचा जन्म झाला होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
धर्मेंद्र यांच्याबद्दल रमेश सिप्पी म्हणाले...
याव्यतिरिक्त, 'शोले'चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे आणि म्हटले की, ''आज धर्मेंद्र आपल्यात नाहीत, पण ते 'शोले'चा प्राण होते. त्यांनी प्रत्येक सीन मोठ्या उत्साहाने आणि जोशाने पूर्ण केला होता. मग तो ट्रेनचा सीन असो किंवा जयच्या मृत्यूनंतर वीरूचा तो राग ज्याने पडद्याला हादरवून सोडले होते.''