एका दिवसात ४ हजार ४५० फोन आल्याने शिल्पा शेट्टी वैतागली, 'बॅस्टियन'बद्दल दिलं मोठं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:13 IST2025-09-04T11:55:47+5:302025-09-04T12:13:07+5:30
शिल्पा शेट्टीचे नामांकित रेस्टॉरंट बॅस्टियन बंद होणार नाही, 'या' ठिकाणी होतंय स्थलांतरित!

एका दिवसात ४ हजार ४५० फोन आल्याने शिल्पा शेट्टी वैतागली, 'बॅस्टियन'बद्दल दिलं मोठं अपडेट
Shilpa Shetty Bastian Restaurant Not Shutting Down: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या 'बॅस्टियन' रेस्टॉरंटमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे रेस्टॉरंट बंद होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या, ज्यामुळे शिल्पाला तिच्या हितचिंतकांकडून एका दिवसात तब्बल ४ हजार ४५० फोन आले. अखेर, या अफवांवर पूर्णविराम देण्यासाठी शिल्पाने स्वतः एक व्हिडीओ शेअर करून यावर स्पष्टीकरण दिलंय.
शिल्पाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती फोनवर बोलताना म्हणते, "मी बॅस्टियन बंद करत नाहीये, मी वचन देते... ठीक आहे बाय". पुढे ती म्हणाली, "मित्रांनो, ४ हजार ४५० फोन! पण एक गोष्ट आहे, मला तुमचं बॅस्टियनसाठी असलेलं हे प्रेम जाणवलं. पण या प्रेमाला टॉक्सिक बनवू नका. मी सांगायला आले आहे की बॅस्टियन कुठेही जाणार नाही".
शिल्पाने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली. तिने सांगितले की, बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी ब्रँडचा विस्तार होत आहे. वांद्रा येथील जुन्या रेस्टॉरंटच्या जागी आता 'अम्माकाई' नावाचे एक नवीन रेस्टॉरंट सुरू होत आहे, ज्यात शुद्ध दक्षिण भारतीय मंगळुरी पदार्थ असतील. यासोबतच, शिल्पाने 'बॅस्टियन' रेस्टॉरंट आता जुहू येथे 'बॅस्टियन बीच क्लब' या नावाने सुरू होत असल्याचेही स्पष्ट केले. या संपूर्ण बदलाचे श्रेय तिने तिचा भाऊ, भागीदार आणि सीईओ रणजीत बिंद्रा यांना दिले, ज्यांनी त्यांच्या कौशल्याने हॉस्पिटॅलिटी व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न दाखवलं.
दरम्यान, शिल्पा शेट्टीने २०१६ मध्ये 'बॅस्टियन बांद्रा' हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं. हे रेस्टॉरंट सी फूडसाठी विशेष प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, शिल्पा सध्या सोनी टीव्हीच्या 'सुपरस्टार डान्सर सीझन ५' मध्ये जज म्हणून दिसत आहे.