शहनाज गिलनं एग्ज फ्रिजिंगसंदर्भात केलं मोठं विधान, आई बनण्याबद्दल म्हणाली -"सध्या वेळ नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:04 IST2025-11-07T14:03:13+5:302025-11-07T14:04:23+5:30
Shehnaaz Gill : 'बिग बॉस १३'ची स्पर्धक शहनाज गिल हिने सांगितलं की, ''भविष्यात तिला आई व्हायचं आहे, पण सध्या तिच्याकडे वेळ नाही.''

शहनाज गिलनं एग्ज फ्रिजिंगसंदर्भात केलं मोठं विधान, आई बनण्याबद्दल म्हणाली -"सध्या वेळ नाही..."
'बिग बॉस १३'ची स्पर्धक शहनाज गिल, जी तिच्या साधेपणाने आणि स्पष्ट बोलण्याच्या अंदाजाने लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते, ती नुकतीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं की, तिला तिचे एग्स फ्रीज करायचे आहेत. शहनाज म्हणाली की, तिला आई व्हायचं आहे, पण त्यासाठी ही योग्य वेळ नाही. सध्या ती तिचं करिअर आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देऊ इच्छिते.
नुकत्याच दिलेल्या मिर्ची पंजाबच्या एका मुलाखतीत शहनाज गिलने सांगितलं की, लग्नासाठी एक योग्य वय असतं. तिच्या मते हे वय साधारण ३० किंवा ३१ वर्ष आहे. योग्य वेळी लग्न करणं खूप महत्त्वाचं आहे, असं तिचं म्हणणं आहे. आई होण्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने हे देखील सांगितलं की, कधीकधी तिला आई व्हावं असं वाटून आनंद होतो, कारण आता ती ३१ वर्षांची झाली आहे आणि मुलांशी तिचं भावनिक नातं खूप खोल आहे. मात्र, सध्या तिच्याकडे लग्नासाठी किंवा बाळांना जन्म देण्यासाठी वेळ नाही.
करिअरवर करायचंय लक्ष केंद्रित
शहनाज सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे तिने अजून बाळ आणि लग्नाचा समावेश तिच्या यादीत केलेला नाही. पण भविष्यात तिला नक्कीच आई व्हायचं आहे, हे तिने स्पष्ट केलं. यासाठी ती एक स्मार्ट पद्धत अवलंबण्याचा विचार करत आहे. शहनाजने सांगितलं की, ती भविष्यात एग फ्रीज करून आई होण्याचा प्लॅन करू शकते. याचा अर्थ असा आहे की, सध्या तिला बाळ नको आहे, पण जेव्हा वेळ योग्य असेल आणि तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य स्थिर होईल, तेव्हा ती नक्कीच आई होईल.
वर्कफ्रंट
शहनाज गिलचा नुकताच प्रदर्शित झालेला पंजाबी भाषेतील चित्रपट 'इक्क कुडी' आहे, जो ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच निर्माती म्हणूनही पदार्पण केलं.