तू खूप लवकर गेलीस! शेफालीच्या आठवणीत Ex पती भावुक, म्हणाला- "मी कायम माझ्या हृदयात..."
By कोमल खांबे | Updated: June 29, 2025 10:36 IST2025-06-29T10:36:28+5:302025-06-29T10:36:54+5:30
Shefali Jariwala Death: अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचा एक्स पती हरमीत सिंगने पोस्ट शेअर करत यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं आहे.

तू खूप लवकर गेलीस! शेफालीच्या आठवणीत Ex पती भावुक, म्हणाला- "मी कायम माझ्या हृदयात..."
Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी(२७ जून) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ती ४२ वर्षांची होती. शेफालीच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचा एक्स पती हरमीत सिंगने पोस्ट शेअर करत यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं आहे.
"माझ्या आयुष्यातील सगळ्यात धक्कादायक घटनांपैकी हे एक आहे. शेफालीच्या आकस्मिक निधनाने मला धक्का बसला आहे आणि यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आम्ही काही वर्ष एकत्र होतो. त्या आठवणी मी कायम माझ्या हृदयाच्या जवळ ठेवेन. तिचे आईवडील (सतीश जी आणि सुनीता जी), पती पराग त्यागी आणि बहीण शिवानी यांच्याप्रती सांत्वनाच्या भावना आहेत. मी युरोपमध्ये असल्याने शेफालीच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहू शकत नाही. हे माझ्यासाठी दु:खद आहे. तू खूप लवकर गेलीस. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. या कठीण काळातून सावरण्यासाठी तुझ्या कुटुंबीयांना बळ मिळो. जय श्री कृष्णा", असं म्हणत हरमीत सिंगने पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं आहे.
पराग त्यागीशी लग्न करण्याआधी शेफालीने सिंगर हरमीत सिंगसोबत संसार थाटला होता. २००४ साली ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र ५ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. २००९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर शेफालीने २०१४ मध्ये पराग त्यागीशी लग्न करत संसार थाटला होता. शनिवारी(२८ जून) मुंबईत शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटी उपस्थित होते.