'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:14 IST2025-12-25T14:13:57+5:302025-12-25T14:14:43+5:30
Sharman Joshi on 3 Idiots Sequel: दिग्दर्शक राजकुमार हिराणी गेल्या अनेक दिवसांपासून '३ इडियट्स'च्या सीक्वलवर काम करत आहेत. आता या वृत्तांवर अभिनेता शर्मन जोशीने आपली प्रतिक्रिया दिली असून, त्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले आहे.

'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपट '३ इडियट्स'च्या सीक्वलबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. मूळ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या शर्मन जोशीने अलीकडेच या सीक्वलबद्दल आशा व्यक्त केली. मात्र, अद्याप त्याला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, हे देखील त्याने स्पष्ट केले. शर्मन जोशीने '३ इडियट्स'मध्ये 'राजू रस्तोगी' ही संस्मरणीय भूमिका साकारली होती. चित्रपटात आमिर खान आणि आर. माधवनसोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना शर्मनने चित्रपटाच्या पुढील भागावर भाष्य केले. शर्मन जोशी म्हणाला, "मला पूर्ण आशा आहे की सीक्वल होईल, पण मला अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही." '३ इडियट्स २' च्या कथेबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे सांगताना तो म्हणाला, "जर या चित्रपटात काही क्षमता असेल, तर फक्त मास्टर राजू सर (राजकुमार हिराणी), अभिजात सर आणि आमिरच यावर काम करतील."
कसा मिळाला होता 'राजू रस्तोगी'चा रोल?
शर्मनने तो किस्साही सांगितला जेव्हा त्याला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. तो म्हणाला, "मी त्यावेळी जिममध्ये 'सिक्स-पॅक ॲब्स' बनवत होतो, तेव्हा राजू सरांचा फायनल कॉल आला. ते म्हणाले की, आता तू पुढची तीन वर्षे जिमचं तोंडही बघायचं नाहीस." या चित्रपटाने आयुष्यावर केलेल्या परिणामाबद्दल बोलताना तो म्हणाला, "जेव्हा कधी मी '३ इडियट्स'चा विचार करतो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू येते."
स्क्रिप्ट झाली फायनल?
'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, राजकुमार हिराणी यांनी '३ इडियट्स २' ची स्क्रिप्ट फायनल केली आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. या सीक्वलमध्ये आमिर खान, करीना कपूर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी ही मूळ जोडी पुन्हा एकत्र दिसू शकते. हिराणी अनेक वर्षांपासून या सीक्वलचा विचार करत होते, पण दादासाहेब फाळके यांच्यावरील बायोपिकचे काम थांबवल्यानंतरच त्यांनी या प्रोजेक्टवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला.