"हात लावलास तर तुझं करियर संपवीन" बिग बींनी संगीतकार शंकर महादेवन यांना दिलेली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:13 IST2025-11-09T14:09:32+5:302025-11-09T14:13:55+5:30
अमिताभ बच्चन यांनी चक्क राष्ट्रीय पुरस्कार विजेते शंकर महादेवन यांना दिली होती 'धमकी'; काय घडलं होतं?

"हात लावलास तर तुझं करियर संपवीन" बिग बींनी संगीतकार शंकर महादेवन यांना दिलेली धमकी
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अमिताभ बच्चन हे पडद्यावर जेवढे गंभीर आणि कठोर दिसतात, तेवढेच ते खासगी आयुष्यात मनमिळाऊ आणि दयाळू आहेत. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत एक असा किस्सा घडला, जेव्हा त्यांनी चक्क राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांना धमकी दिली होती. अमिताभ यांनी शंकर महादेवन यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराला नेमकी का आणि कोणती धमकी दिली होती, याबद्दल जाणून घेऊया.
नुकतंच शंकर महादेवन यांनी एका लोकप्रिय गाण्याच्या आठवणी शेअर केल्या, ज्यावेळी खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांना "मी तुमचे करिअर उध्वस्त करेन," अशी 'धमकी' दिली होती. ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या 'ऑल इंडिया मेहफिल' पॉडकास्टमध्ये बोलताना शंकर महादेवन यांनी हा किस्सा सांगितला. त्यांनी 'बंटी और बबली' (Bunty Aur Babli) चित्रपटातील सुपरहिट गाणे 'कजरा रे' (Kajra Re) च्या रेकॉर्डिंगच्या आठवणींना उजाळा दिला. हे गाणे २००५ मध्ये प्रदर्शित झाले होते आणि आजही ते प्रचंड लोकप्रिय आहे. हे गाणे ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
शंकर महादेवन यांनी सांगितले की, "मी अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'कजरा रे' या गाण्याचं एक रफ व्हर्जन रेकॉर्ड केलं होतं. म्हणजे ते आल्यावर आपला आवाज डब करू शकतील. त्या गाण्यात जावेद अलीनं अभिषेकसाठी गायलं होतं आणि अमिताभजींसाठी मी तात्पुरता माझा आवाज वापरला होता. यानंतर एका कार्यक्रमात माझी अमिताभ बच्चन यांच्याशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'सर, कृपया या आणि तुमचा भाग डब करा. आपल्याला गाणे मिक्स करावे लागेल".
यावर बिग बींनी विचारले, "कोणते गाणे?" मी त्यांना सांगितले, "कजरा रे". त्यावर ते म्हणाले, "मी काय त्यात डब करू? गाणं तर परफेक्ट आहे" मग मी सांगितलं की, "सर, मी त्या गाण्यात तुमच्या जागी तात्पुरता गायलोय, तुम्ही आल्यावर ते गाणं पुन्हा करायचंय". त्यावर अमिताभ बच्चन हसत हसत म्हणाले, "नाही नाही, हे असंच राहू दे! तू हे बदलायचा प्रयत्न केलास, तर मी तुझं करिअर संपवीन".
शंकर महादेवन यांनी पुढे हसून स्पष्ट केले की, त्यांना माहीत होते की अमिताभ बच्चन हे मस्करी करत आहेत. शंकर महादेवन यांनी 'कभी अलविदा ना कहना' चित्रपटातील 'रॉक अँड रोल' गाण्याच्या शूटिंगदरम्यानचीही एक आठवण शेअर केली. महादेवन म्हणाले, "मला आठवतंय, अमिताभ बच्चन हे त्यावेळी 'रॉक अँड रोल' या गाण्याचं शूटिंग करीत होते. आम्ही त्यांना सेटवर भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला अगदी प्रेमाने मिठी मारली आणि मला अक्षरश: उचलून घेतलं. कारण, त्यांना ते गाणं फारच आवडलं होतं. मला मिठी मारत ते म्हणाले, 'काय गाणं बनवलंस रे'".