Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:33 PM2022-07-22T16:33:36+5:302022-07-22T16:34:12+5:30

Shamshera Movie Review: तब्बल ४ वर्षांनंतर रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करतो आहे.

Shamshera Movie Review: Plan to watch Ranbir Kapoor and Sanjay Dutt's 'Shamshera'? Then read this review | Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू

Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : रणबीर कपूर, संजय दत्त, वाणी कपूर, सौरभ शुक्ला, इरावती हर्षे, परितोष त्रिपाठी, त्रिधा चौधरी
दिग्दर्शक : करण मल्होत्रा
निर्माते : आदित्य चोप्रा
कालावधी : २ तास ३९ मिनिटे
स्टार - दोन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

भारत आणि भारताबाहेर साडे पाच हजारांहून अधिक स्क्रीन्सवर जेव्हा एखादा सिनेमा रिलीज होतो, तेव्हा आपोआपच अपेक्षा वाढतात. चार वर्षांच्या गॅपनंतर रणबीर कपूरसारखा मोठा स्टार मोठया पडद्यावर परततो तेव्हा अपेक्षा आणखी वाढतात. अशावेळी अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता काहीतरी वेगळं दाखवत प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करणं गरजेचं असतं, पण 'शमशेरा' असं काहीच करण्यात यशस्वी झाल्याचं दिसत नाही. दिग्दर्शक करण मल्होत्रानं मोठ्या कॅनव्हासवर दक्षिणात्य शैलीतील हिंदी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

कथानक : खमेरण जमातीचे लोक आणि त्यांचा सरदार शमशेरा यांची ही कथा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मागसवर्गीय असणारे खमेरण कोणापुढे न झुकता जगत असतात. मोघलांचं राज्य आल्यावर त्यांना आपलं घर सोडून जंगलाचा आश्रय घ्यावा लागतो. 'कर्म से डकैत, धर्म से आझाद' हा मंत्र जपत शमशेरा आपल्या लोकांसाठी लढत असतो. इंग्रजांचं राज्य येतं आणि उच्चवर्णीय दरोगा शुद्ध सिंगनं दिलेल्या स्वातंत्र्याच्या भूलथापांना शमशेरा बळी पडतो. खमेरणांना समाजातील घाण मानणारा शुद्ध सिंग त्यांना स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवून एका किल्ल्यात कैद करतो. तिथून बाहेर पडून आपल्या लोकांना वाचवण्यासाठी शमशेरा एक युक्ती करतो, पण मृत्यूमुखी पडतो. त्यानंतर खमेरणांचं काय होतं ते चित्रपटात पहायला मिळतं.

लेखन - दिग्दर्शन : चित्रपटाचा विषय वेगळा आणि आजवर गाजलेल्या दक्षिणात्य चित्रपटांच्या फॉर्म्युल्याशी मिळताजुळता आहे. पटकथेची मांडणी रहस्य टिकवून ठेवत उत्कंठा वाढवणारी नसल्यानं सुरुवातीपासूनच कंटाळा येऊ लागतो. कोणत्याही संकटांशी दोन करण्यास सज्ज असणारा शमशेरा आणि त्याचे जिगरबाज साथीदार किल्ल्यात गेल्यावर तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नही करत नाहीत. केवळ शमशेरा आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो आणि त्याचेच साथीदार दगडाने ठेचून त्याला मारतात. या गोष्टी न पटणाऱ्या वाटतात. क्लायमॅक्समध्ये कावळ्यांच्या थव्यानं आक्रमण करत शत्रूवर तुटून पडणं ही जरा अतिशयोक्ती वाटते. पटकथा लेखनात घोळ झाल्यानं चित्रपट अखेरपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होत नाही. किल्ल्यातून बाहेर पडल्यावर शमशेरा शत्रूवर हल्ला करेल असं वाटतं, पण तो दरोडे टाकून सोनं जमा करून इंग्रजांनी केलेला फसवा करार पूर्ण करण्यासाठी धडपडत रहातो. यात तो इंग्रज अधिकाऱ्याला आव्हान देतो, शुद्ध सिंगच्या डोळ्यांदेखत नायिकेला पळवतो आणि शमशेराला पकडायला आलेला शुद्ध सिंग त्याच्या मागे न जाता सोनं मिळाल्यानं खुश होतो आणि शमशेराला जाऊ देतो. शुद्ध सिंगच्या माध्यमातून करण्यात आलेली शायरी चांगली आहे. फाईट सिक्वेन्सेस आणि व्हिएफएक्सही छान आहेत. वाणी कपूरचे कॅास्च्युम्स वगळता इतर सर्वांचे कपडे काळाचं भान राखून बनवले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातही अंग प्रदर्शन करणारे कपडे वाणीला देण्यात आले आहेत. गाणी ठिकठाक आहेत. इतर तांत्रिक गोष्टीही चांगल्या आहेत. 

अभिनय : रणबीर कपूरनं दुहेरी भूमिका साकारताना जीव ओतला आहे. डान्सपासून फाईटपर्यंत सर्वच ठिकाणी त्यानं छान काम करत शमशेरा आणि बल्ली ही दोन्ही कॅरेक्टर्स सुरेखरीत्या सादर केली आहेत. वाणी कपूर डान्सच्या माध्यमातून लक्ष वेधून घेते. त्या जोडीला अंग प्रदर्शन आणि बोल्ड सीन आहेतच. इरावती हर्षेला खूप महत्त्वाचा रोल मिळाला असून, तिनं तो अगदी सहजपणे साकारला आहे. चेहऱ्यावर स्माईल आणि मनात कपट असलेला खलनायक संजय दत्तनं कुठेही ओव्हर अॅक्टींग न करता सादर केला आहे. सौरभ शुक्लांचं कॅरेक्टरही खूप महत्वाचं असून, त्यांनी आपल्या नेहमीच्याच मिश्कील शैलीत ते साकारलं आहे. 

सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय चांगला झाला आहे. या जोडीला लोकेशन्स, कला दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी या गोष्टीही उजव्या आहेत.

नकारात्मक बाजू : गती काहीशी मंद आणि लांबी जास्त आहे. काही दृश्यांना कात्री लावण्याची गरज होती. रोमँटिक साँगही कथानकात व्यत्यय आणतं.

थोडक्यात : रणबीर आणि संजयचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच गर्दी करतील. या दोघांसोबतच इतरांचाही अभिनय पहायचा असेल तर एकदा चान्स घ्यायला हरकत नाही.

Web Title: Shamshera Movie Review: Plan to watch Ranbir Kapoor and Sanjay Dutt's 'Shamshera'? Then read this review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.