बच्चन कुटुंबाची दिवाळी पार्टी, शाहरुख खानने वाचवला होता महिलेचा जीव; नक्की काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:47 IST2025-10-21T14:46:57+5:302025-10-21T14:47:25+5:30
शाहरुख खान खऱ्या आयुष्यात बनला होता 'हिरो'

बच्चन कुटुंबाची दिवाळी पार्टी, शाहरुख खानने वाचवला होता महिलेचा जीव; नक्की काय घडलं होतं?
सध्या सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी तर दिवाळी पार्टीचं आयोजन होतं. सलमान खानची बहीण अर्पिता खानकडे दिवाळी पार्टी असते. शाहरुख खानच्याही 'मन्नत'मध्ये आधी पार्टी असायची. मात्र यावेळी 'मन्नत'मध्ये काम सुरु असल्याने पार्टी होणार नाही. काही वर्षांपूर्वी बच्चन कुटुंबाची दिवाळी पार्टीही प्रसिद्धीझोतात असायची. त्याचाच एक किस्सा म्हणजे शाहरुख खानने या पार्टीत एका महिलेचा जीव वाचवला होता. काय आहे तो किस्सा?
बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत देशातील अनेक दिग्गज लोक हजर होते. राजकारण, खेळ आणि फिल्मी जगतातील दिग्गज 'जलसा'वर एकत्र आले होते. फटाक्यांची आतिषबाजी, संगीत, अंगणात दिव्यांची आरास असा एकंदर दिवाळीचा माहोल बनला होता. दरम्यान ऐश्वर्या रायची मॅनेजर अर्चना सदानंद इतरांशी बोलत होती. तेव्हा तिचा डिझायनर लेहेंगा दिव्याच्या संपर्कात आला आणि लेहेंगाने पेट घेतला. लेहेंगा रेशमचा असल्याने एकदम गतीने आग वाढत गेली. यामुळे सगळेच घाबरले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या शाहरुख खानने समयसूचकता दाखवली. तो धावत अर्चनाजवळ गेला आणि स्वत:चं जॅकेट काढून तिच्याभोवती गुंडाळलं. जोवर आग पूर्ण विझत नाही तोवर तो प्रयत्न करत राहिला.
अशा प्रकारे शाहरुख खानमुळे अर्चना सदानंदचा जीव वाचला. या दुर्घटनेत शाहरुख खानही किरकोळ भाजला. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. हा किस्सा दुसऱ्या दिवशी फराह खानने ट्वीट करत सांगितला होता. तिने शाहरुख खानला 'मोहब्बत-मॅन टू द रेस्क्यू' असं संबोधलं.