'सैयारा' गर्ल अनीत पड्डाला ऑफर झाली आणखी एक लव्हस्टोरी, 'या' दिग्दर्शकावर सोपवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:20 IST2025-08-26T15:19:47+5:302025-08-26T15:20:14+5:30
आदित्य चोप्राने 'या' दिग्दर्शकाला दिली पुन्हा एक संधी

'सैयारा' गर्ल अनीत पड्डाला ऑफर झाली आणखी एक लव्हस्टोरी, 'या' दिग्दर्शकावर सोपवली जबाबदारी
हिंदी मनोरंजनविश्वात 'सैयारा' सिनेमाने धुमाकूळ घातला. मोहित सूरी दिग्दर्शित सिनेमात अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अहान पांडे ही तरुण नवोदित कलाकारांची जोडी दिसली. दोघांची केमिस्ट्री तरुणाईला वेड लावून गेली. अनीत पड्डाने याआधी काही सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र आता 'सैयारा'च्या यशाने तिला आता वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. २२ वर्षीय अनीतला आता नवीन सिनेमा ऑफर झाला आहे. ही एक लव्हस्टोरीच असणार आहे.
'मिड डे'रिपोर्टनुसार, अनीत पड्डा आणि अहान पांडे यांच्या करिअरवर आदित्य चोप्राचं बारीक लक्ष असणार आहे. 'सैयारा'च्या यशानंतर दोघंही जेन झी पिढीचा चेहरा बनले आहेत. अशात रोमँटिक सिनेमांसाठी हा चांगला काळ आहे. आदित्य चोप्राने आता 'बँड बाजारा बारात'फेम मनीष शर्मावर जबाबदारी सोपवली आहे. एका नव्या सिनेमाचं त्यांनी प्री प्रोडक्शन सुरु केलं आहे. पुढील वर्षी सिनेमाचं शूट सुरु होईल. याच्या कास्टिंगबद्दल सांगायचं तर अनीत पड्डाला यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तिच्या अपोझिट लीड हिरो कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनीष शर्माने 'बँड बाजा बारात'सह 'शुद्ध देसी रोमान्स'हा सिनेमाही दिग्दर्शित केला होता. शिवाय सलमान खानच्या 'टायगर ३'चंही दिग्दर्शन केलं होतं. मात्र तो सिनेमा फारसा कमाल दाखवू शकला नाही. आता आदित्य चोप्राने पुन्हा मनीष शर्मावर विश्वास टाकला आहे. या नवीन सिनेमाची कथा आणि स्टारकास्ट कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.