'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:43 IST2025-08-30T12:42:25+5:302025-08-30T12:43:44+5:30
Sholey Movie: 'शोले'मध्ये अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही एक छोटी पण संस्मरणीय भूमिका केली होती. यात त्यांनी अहमद नावाच्या तरुणाची भूमिका केली होती.

'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट
हिंदी सिनेसृष्टीतील क्लासिक चित्रपट 'शोले' (Sholey Movie) प्रदर्शित होऊन ५० वर्षे उलटली आहेत. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या दिग्गज कलाकारांनी मिळून हा चित्रपट अमर केला. शोलेमध्ये अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनीही एक छोटी पण संस्मरणीय भूमिका केली होती. यात त्यांनी अहमद नावाच्या तरुणाची भूमिका केली होती, जो व्हीलचेअरवर बसलेल्या एका वृद्ध माणसाचा नातू होता. नुकतेच आयएएनएसशी बोलताना सचिन पिळगावकर यांनी या भूमिकेची एक आठवण सांगितली. त्यांनी सांगितलं की दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांचा एक महत्त्वाचा सीन चित्रपटातून काढला होता आणि त्यामागील कारणंही सांगितलं होतं. दरम्यान, एका फेसबुक पोस्टमध्ये सचिन पिळगावकर यांनी त्या सीनचा एक फोटो देखील शेअर केला होता.
सचिन पिळगावकर म्हणाले की,'''शोले'मध्ये माझ्या हत्येचा जो सीन होता, तो गब्बरच्या अड्ड्यावर चित्रीत झाला होता. पण काही कारणांमुळे रमेशजींनी तो एडिटिंगदरम्यान काढून टाकला. पहिले कारण म्हणजे चित्रपट आधीच खूप लांब झाला होता. दुसरे कारण म्हणजे, १६-१७ वर्षांच्या मुलाला ठार मारताना दाखवणे प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू शकेल, असं रमेशजींना वाटलं. त्याऐवजी शेवटी गब्बरच्या हातावर काळी मुंगी चालताना दाखवली होती आणि गब्बर म्हणतो, 'रामगडचा मुलगा आला आहे..' असं वाक्यं बोलून तो ती मुंगी चिरडतो. लगेच पुढे गावात माझा मृतदेह घोड्यावरून आणलेला दाखवला जातो, यावरून स्पष्ट होतं की गब्बरने मला मारलं आहे.''
''रमेशजींचा निर्णय योग्य होता.''
त्यांनी पुढे सांगितले की, ''तेव्हा मला फार वाईट वाटलं, कारण गब्बरसोबतचा माझा एक खास सीन काढून टाकण्यात आला. प्रत्येक अभिनेत्याला तसं वाटलं असतं. मात्र आज मी स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे रमेशजींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मला जाणवलं.''